पनवेल, कोकणनामा वृत्त- गणेशोत्सवानिमित्त कोकणातील आपल्या गावी जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गणेशभक्तांचा प्रवास सुखकर व आरामदायी व्हावा, यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वतीने दोन विनामूल्य बससेवांचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन्ही बस सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघ, पनवेल–रायगड यांच्या माध्यमातून बुक करण्यात आल्या आहेत. सदर दोन्ही बस शनिवार, दिनांक १२ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४.४५ वाजता पनवेल येथून सिंधुदुर्गच्या दिशेने रवाना होणार असून, यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती लाभणार आहे.
ही विनामूल्य बससेवा उपलब्ध करून देण्यासाठी संघाचे सदस्य स्वाती ऑप्टिक्सचे मालक प्रल्हाद साटम आणि संघाचे उपाध्यक्ष संतोष चव्हाण यांनी विशेष प्रयत्न केले. तसेच प्रदीप रावले, बाबाजी नेरुरकर आणि संघाचे सचिव रामचंद्र मोचेमाडकर यांनी पनवेल एस.टी. डेपोशी सातत्याने संपर्क साधून बस बुकिंगची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.
या उपक्रमाबद्दल बोलताना संघाचे अध्यक्ष केशव राणे यांनी सांगितले की, “गणेशोत्सवानिमित्त सिंधुदुर्गातील गणेशभक्तांना आपल्या गावी जाण्यासाठी आरामदायी, सुरक्षित आणि सुखकर प्रवासाची सुविधा मिळावी, या उद्देशाने आमदार प्रशांतदादा ठाकूर यांनी विनामूल्य बससेवा उपलब्ध करून दिली आहे. त्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघ आणि सिंधुदुर्गातील सर्व गणेशभक्तांच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो.”गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणावर नागरिक कोकणाकडे प्रवास करतात. अशा वेळी गणेशभक्तांना विनामूल्य बससेवेचा लाभ मिळणार असल्याने संघाच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
