Friday, October 9, 2026
Homeकोकणदिवेआगार समुद्रात पर्यटनासाठी आलेले ८ विद्यार्थी बुडाले

दिवेआगार समुद्रात पर्यटनासाठी आलेले ८ विद्यार्थी बुडाले

आळंदीच्या ‘विनर्स अकॅडमी’च्या सहलीत दुर्दैवी अंत

दिवेआगर, कोकणनामा वृत्त- रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात असलेल्या प्रसिद्ध दिवेआगार समुद्रकिनारी एक अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी दुर्घटना घडली आहे. आळंदी येथील ‘विनर्स अकॅडमी’च्या अकरावी आणि बारावीच्या विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचा एक ग्रुप सहलीसाठी रायगडमध्ये आला होता. गुरुवार, १ ऑक्टोबर रोजी दुपारी अडीचच्या सुमारास हा आनंददायी प्रवास एकाएकी मोठ्या शोकात बदलला, जेव्हा समुद्रात पोहण्यासाठी उतरलेल्या आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला.

या सहलीमध्ये विनर्स अकॅडमीचे २५ विद्यार्थी, १७ मुली आणि ६ शिक्षक असे एकूण ४८ जण सहभागी झाले होते. सर्व विद्यार्थी १६ ते १७ वयोगटातील असून ते विज्ञान शाखेचे शिक्षण घेत होते. आनंदाचे वातावरण असलेल्या या सहलीत मुले दिवेआगार समुद्रकिनारी पोहोचली तेव्हा सुरुवातीला सर्वकाही ठीक होते. मात्र, पर्यटनाचा आनंद घेत असताना या ग्रुपमधील आठ विद्यार्थी समुद्रात पोहण्यासाठी उतरले. नुकत्याच झालेख्या पावसामुळे किनाऱ्यालगतच्या वाळूमध्ये काही खड्डे निर्माण झाले होते आणि पाण्याची नेमकी खोली किती आहे याचा अंदाज या विद्यार्थ्यांना आला नाही. त्यामुळे ते अंदाजाने पुढे समुद्रात पोहोचत गेले आणि अचानक खोल पाण्यात बुडाले.

विद्यार्थी बुडत असल्याचे लक्षात येताच त्यांच्या सहकाऱ्यांनी मदतीसाठी मोठा हाहार आणि आक्रांत सुरू केला. त्यावेळी दिवेआगार समुद्रकिनारी वॉटर स्पोर्ट्सचा व्यवसाय करणारे बाबू साळुंखे हे मदतीसाठी तातडीने धावून गेले. त्यांनी समुद्रात उतरून बुडलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. या घटनेची माहिती मिळताच दिवी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष आवटी यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीने मोठे बचावकार्य हाती घेण्यात आले. पाण्यात बुडालेल्या सर्व आठ विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले, परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता आणि उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

या दुर्दैवी घटनेत मृत झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये यश किरण वानखेडे, सोहम तुकाराम भांडवलकर, तन्मय दत्तारय वहिले, कौस्तुभ संदीप दांडे, कैवल्य सतीश वासनकर, राजवीर युवराज वहिले, प्रणव रामदास बनसोडे आणि सुमित भरत अहिरराव यांचा समावेश आहे. हे सर्व तरुण विद्यार्थी आपल्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहत होते, परंतु एकाच क्षणात काळाने त्यांच्यावर घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

पर्यटनासाठी आलेल्या विद्यार्थ्यांवर काळाने घाला घातल्यामुळे दिवेआगार परिसर शोकाकुल झाला आहे. आपल्या सहकाऱ्यांना आणि मित्रांना अशा प्रकारे अचानक गमावल्यामुळे इतर विद्यार्थ्यांचा आक्रोश पाहून समुद्रकिनारी उपस्थित असलेले स्थानिक नागरिक, व्यावसायिक आणि इतर पर्यटक देखील सुन्न व भावुक झाले. काही क्षणांपूर्वीच आनंदात आणि उत्साहात गजबजलेला हा समुद्रकिनारा या दुर्दैवी घटनेनंतर पूर्णपणे शोकमय वातावरणात बुडून गेला. या संपूर्ण घटनेमुळे आळंदी आणि रायगड परिसरात एकच शोककळा पसरली असून शिक्षण क्षेत्रातून तीव्र दु:ख व्यक्त केले जात आहे.

संपादक उमाजी म. केळुसकर
संपादक उमाजी म. केळुसकरhttp://kokannama.in
सा. कोकणनामा या वृत्तपत्राचे संपादक, साहित्यिक उमाजी म. केळुसकर हे गेली ४० वर्षे पत्रकारितेत आहेत. कथा, कादंबरी, ललितलेख, गूढकथा, ऐतिहासिक कथा, बालकथा, कविता, नाटक आदी त्यांची २० पुस्तके प्रकाशित झाली आहेत. या पुस्तकांसह साहित्य आणि पत्रकारिता क्षेत्रातील निर्भीड आणि रचनात्मक कार्याबद्दल राज्यातील विविध संस्थांतर्फे त्यांना पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

error: Content is protected !!