६६ वा वर्धापनदिन; सहकारातील विश्वासाची परंपरा कायम
अलिबाग, कोकणनामा वृत्त- रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ६६ वर्षांचा विश्वासाचा प्रवास पूर्ण करताना विकासाची गती कायम ठेवली असून, ३० सप्टेंबर २०२६ अखेर बँकेचा व्यवसाय ८,३६७.५७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. या प्रगतीच्या प्रवासात बँकेचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी, ६६ वर्षांचा विश्वास आणि सातत्यपूर्ण प्रगती ही रायगड जिल्हा बँकेची खरी ओळख असल्याचे नमूद केले आहे. गेल्या अनेक वर्षांत बदलत्या काळानुसार बँकेला नवी दिशा देत आधुनिक बँकिंग आणि तंत्रज्ञानाचा स्वीकार केला असून, आजची व्यवसायवाढ ही सभासद, ग्राहक आणि कर्मचाऱ्यांच्या विश्वासाची व एकत्रित प्रयत्नांची फलश्रुती असल्याचे त्यांनी सांगितले आहे. रायगडच्या आर्थिक विकासाला अधिक बळ देत बँकेची ही प्रगतीची वाटचाल अशीच सुरू राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
१९६० मध्ये स्थापन झालेल्या या बँकेने ६६ वर्षांच्या प्रवासात कृषी, सहकार आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देत विश्वासाची भक्कम परंपरा निर्माण केली आहे. बदलत्या काळानुसार आधुनिक तंत्रज्ञान आणि नवे बँकिंग स्वीकारत आता १० हजार कोटींच्या व्यवसायाच्या नव्या टप्प्याकडे बँकेची वाटचाल सुरू आहे. ३१ मार्च २०२६ रोजी ७,१०५.१४ कोटी रुपयांचा असलेला व्यवसाय ११ जुलै रोजी झालेल्या ६५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेपर्यंत ८,००० कोटी रुपयांच्या पुढे गेला होता. सप्टेंबरअखेर बँकेने ८,३६७ कोटी रुपयांचा टप्पा गाठला असून, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत बँकेच्या व्यवसायात तब्बल १,२६२ कोटी रुपयांहून अधिक वाढ झाली आहे. तसेच २०२६-२७ आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत बँकेने ७०.२५ कोटी रुपयांचा ढोबळ नफा नोंदविला आहे. सहकार, कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेशी जोडलेली आपली भूमिका कायम ठेवत बदलत्या आर्थिक गरजांनुसार बँकेने विस्तारलेली सेवा आणि व्यवसायाची व्याप्ती यामुळे हा वर्धापनदिन बँकेच्या प्रगतीच्या नव्या पर्वाची नोंद करणारा ठरत आहे.
या प्रगतीबाबत बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांनी सांगितले की, व्यवसायवाढीसोबत ग्राहकसेवा अधिक गतिमान, कर्जप्रक्रिया सुलभ आणि वसुली प्रभावी करण्यावर बँकेचा भर आहे. शासकीय योजनांचा लाभ पात्र शेतकरी सभासदांपर्यंत वेळेत पोहोचविण्यासाठी शाखास्तरावर विशेष प्रयत्न सुरू आहेत. बँकेच्या प्रगतीत अधिकारी, कर्मचारी आणि ग्राहकांचे योगदान महत्त्वाचे असून त्याबद्दल त्यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेच्या २०२६ मधील अंमलबजावणीतही रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकरी ग्राहकांना तत्पर सेवा दिली आहे. शासनाने जाहीर केलेल्या दुसऱ्या व तिसऱ्या यादीत बँकेच्या एकूण ७,३४२ पात्र सभासदांचा समावेश आहे. त्यापैकी ३,३९२ सभासदांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले असून, त्यांच्या खात्यात एकूण २०.४६ कोटी रुपयांची कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली आहे. उर्वरित पात्र सभासदांचेही आधार प्रमाणीकरण लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी बँकेच्या शाखास्तरावर विशेष प्रयत्न सुरू असून, संबंधित शेतकरी सभासदांशी संपर्क साधून त्यांना आवश्यक मार्गदर्शन व सहकार्य केले जात आहे.
दरम्यान, बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत बँकेच्या व्यवसायविस्ताराला अधिक गती देण्यासाठी स्वतंत्र विपणन विभाग सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या विभागाचे प्रादेशिक कार्यालय पनवेल येथे सुरू करण्यात येणार असून, बदलत्या बाजारपेठेच्या गरजा आणि नव्या ग्राहकांपर्यंत बँकेच्या सेवा अधिक प्रभावीपणे पोहोचविण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आले आहे.
