भाकरवड, कोकणनामा वृत्त- गणेशोत्सवाच्या चैतन्यमय वातावरणात आणि बाप्पांच्या साक्षीने अलिबागच्या भाकरवडमध्ये साहित्याचा अनोखा संगम पाहायला मिळाला. निमित्त होते, नरेश पाटील यांच्या निवासस्थानी आयोजित विशेष ‘गणपती बाप्पाविशेष कवी संमेलना’चे! गुरुवार, दिनांक १७ सप्टेंबर २०२६ रोजी पार पडलेल्या या संमेलनाने केवळ काव्यप्रेमींचे मन जिंकले नाही, तर सामाजिक प्रश्नांवर परखड बोटही ठेवले.
गणेशाचे पूजन, श्रीफळ वाढवून आणि गणरायाला वंदन करून कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात झाली. प्रास्ताविकात कार्यक्रमप्रमुख नरेश पाटील यांनी सर्व उपस्थितांचे मनःपूर्वक स्वागत केले. या विशेष सोहळ्यात नरेश पाटील यांच्या लेखणीतून साकारलेल्या ‘श्री गणेशाची षोडशोपचार पूजा’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या शुभहस्ते थाटात पार पडले.

या साहित्यिक संमेलनाला अलिबाग परिसरातील अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित होते. यात अखिल भारतीय आगरी साहित्य संस्था, अलिबागचे अध्यक्ष कैलास पिंगळे, रायगड भूषण एल.बी. पाटील, सदानंद ठाकूर, रामचंद्र म्हात्रे, उरण शाखा अध्यक्ष मच्छिंद्र म्हात्रे, कवी रमण पंडित, शिवप्रसाद पंडित, दिलीप मोकल, अमृत जुईकर, प्रकाश पाटील, कवी मोहन पाटील, प्रकाश मिसाळ, आदर्श शिक्षक कवी नरेश पाटील, राजाराम भगत, संजीव पाटील, शिक्षक महेंद्र पाटील, निवृत्त पोलिस उपनिरीक्षक दिलीप पाटील, राजेंद्र पाटील, दयानंद म्हात्रे, विनायक पाटील आदींचा समावेश होता. नरेश पाटील परिवाराकडून या सर्व उपस्थित प्रतिभावंतांचा सन्मान करण्यात आला.

संमेलनात उपस्थितांनी केवळ काव्यवाचनच केले नाही, तर समाजमनाला आरसा दाखवणारे ज्वलंत प्रश्न कवितेच्या माध्यमातून मांडले. स्मार्ट मीटर, वाढीव वीज बिल, रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग, ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था आणि वाढते प्रदूषण यांसारख्या गंभीर विषयांवर कवींनी गणरायाला साद घातली. विशेषतः, बिकट रस्त्यांमुळे होणारे अपघात आणि प्रवाशांचे हाल यावर भावनिक होत “रस्ता खड्ड्यात की खड्डा रस्त्यात” असा सवाल कवींनी आपल्या रचनांमधून उपस्थित केला. याशिवाय, काहींनी गणेशोत्सवावर सुमधुर गीते गाऊन वातावरण भक्तिमय केले. या सर्व काव्यप्रवासाला पत्रकार जीवन दत्तात्रेय पाटील यांनी आपल्या मृदुंगाच्या तालावर सुरेख साथ दिली.
माणसाला जोडणारा खरा धागा म्हणजे माणूसपण असून, कवितेतून समाजात चांगला संदेश गेला पाहिजे, असा सूर यावेळी उमटला. विचारांची उंची आणि खोली वाढायला हवी, यावर जोर देत विसर्जन मिरवणुकीतील डिजेच्या अनिर्बंध वापरावर बंदी घालण्याची आक्रमक भूमिकाही मान्यवरांनी आपल्या मनोगतातून मांडली.
