Friday, October 9, 2026
Homeकोकण'आद्य नाईक स्मृती गणेश सजावट स्पर्धा २०२६' उत्साहात संपन्न; विजेत्यांचा गौरव

‘आद्य नाईक स्मृती गणेश सजावट स्पर्धा २०२६’ उत्साहात संपन्न; विजेत्यांचा गौरव

अनिल पाटील आणि सानिया पाटील सजावटीचे सरताज; ८६ स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग

अलिबाग, कोकणनामा वृत्त- श्री समर्थ विचार फाउंडेशन रायगडच्या वतीने अलिबाग तालुक्यात ‘आद्य नाईक स्मृती गणेश सजावट स्पर्धा २०२६’ अतिशय उत्साहात आणि दिमाखात पार पडली. गणेशोत्सवातील भक्तीचा गजर, आकर्षक सजावट आणि कल्पक देखाव्यांच्या रेलचेलमध्ये या स्पर्धेने तालुक्यात विशेष आकर्षण निर्माण केले. तालुक्यातील विविध गावांमधील तब्बल ८६ स्पर्धकांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेत आपल्या कल्पकतेची आणि कलाकौशल्याची सुंदर झलक दाखवली. सामाजिक विषयांवरील देखावे, पर्यावरणपूरक सजावट आणि टाकाऊ वस्तूंचा कलात्मक वापर यामुळे या स्पर्धेला एक वेगळीच उंची प्राप्त झाली. गणेश सजावट ही केवळ देखाव्यापुरती मर्यादित न राहता त्यातून सामाजिक प्रश्न, देशभक्ती, पर्यावरण संवर्धन आणि बदलत्या जीवनशैलीचे प्रतिबिंब उमटावे, हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता. स्पर्धकांनी सादर केलेल्या विविध संकल्पनांमधून त्यांच्या कल्पकतेबरोबरच त्यांची प्रगल्भ सामाजिक जाणीवही उत्तमरीत्या अधोरेखित झाली. गावागावांतील गणेशभक्तांना आपल्या कलागुणांना एक हक्काचे व्यासपीठ मिळाल्यामुळे या स्पर्धेने यंदाच्या उत्सवात एक नवा आणि सतेज रंग भरला.

या स्पर्धेत मोठे शहापूर येथील अनिल दिलीप पाटील यांनी पहलगाम हल्ला आणि त्याला भारतीय सैन्याने दिलेले प्रत्युत्तर या अत्यंत संवेदनशील व देशभक्तीपर विषयावर आधारित हुबेहूब देखावा साकारत उपस्थितांचे व प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. तर माणकुळे येथील सानिया कृष्णा पाटील यांनी ‘बदलती चाळ संस्कृती’ हा विषय अत्यंत प्रभावीपणे मांडत टाकाऊ वस्तूंच्या पुनर्वापरातून सजावटीचे एक नवे व आकर्षक रूप साकारले. सामाजिक आशय आणि कलात्मक अभिव्यक्ती यांचा अत्यंत सुंदर संगम घडवत या दोघांनी आपापल्या गटांत प्रथम क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन केले. मुख्य गणेश सजावट गटात अनिल दिलीप पाटील (शहापूर) यांनी प्रथम क्रमांक पटकावला असून, द्वितीय क्रमांक संतोष पाटील आणि पाटील परिवार (नारंगी-चिंचवली), तृतीय क्रमांक विष्णू मोकल (सुरकीचापाडा, हाशिवरे), चतुर्थ क्रमांक वर्षा योगेश पाटील (खिडकी) आणि पाचवा क्रमांक भाग्येश किरण म्हात्रे (केतकीचा मळा) यांनी पटकावला. तसेच या गटात जयेश गंगाधर ठाकूर (हाशिवरे), शशिकांत शंकर म्हात्रे (कावाडे), सुशांत संजय ठाकूर (माणकुळे), वैष्णवी रणजित पाटील (शेखाचेगाव) आणि निहार सचिन पाटील (विरवाडी) यांना उत्तेजनार्थ पारितोषिके प्रदान करण्यात आली.

दुसऱ्या बाजूला, ‘टाकाऊतून टिकाऊ’ या उपक्रमांतर्गत टाकाऊ वस्तूंचा अत्यंत कल्पक वापर करून आकर्षक सजावट साकारण्याच्या गटातही स्पर्धकांनी तुफान प्रतिसाद दिला. या गटात सानिया कृष्णा पाटील (माणकुळे) हिने प्रथम क्रमांक पटकावत आपले नैपुण्य सिद्ध केले. याशिवाय विपुल ज्ञानेश्वर पाटील (शेखाचेगाव) द्वितीय, अर्जुन काशिनाथ गावंड (फोफेरी) तृतीय, रविंद्र देवराम पाटील (बहिरीचा पाडा) चतुर्थ, तर चक्रपाणी मोहन पाटील (पेझारी) यांनी पाचवा क्रमांक मिळवला. या गटात पंकज वसंत म्हामे (हाशिवरे), सचिन सिताराम कडवे (सारळ) आणि मिलिंद गजानन पाटील (सातघर) यांना उत्तेजनार्थ पारितोषिके जाहीर झाली. विशेष म्हणजे ‘पाटील टेंडर्स’ यांच्या वतीने ‘टाकाऊतून टिकाऊ’ या संकल्पनेतून विशेष व समाजप्रबोधनाचे संदेश देणाऱ्या देखाव्यांसाठी सचिन सिताराम कडवे (सारळ), रविंद्र देवराम पाटील (बहिरीचा पाडा) आणि चक्रपाणी मोहन पाटील (पेझारी) यांचा विशेष गौरव करण्यात आला. सर्व विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

या स्पर्धांचे अत्यंत निष्पक्ष आणि सखोल परीक्षण जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे सुरेश पाटील, ज्येष्ठ पत्रकार आविष्कार देसाई, दैनिक कृषिवलचे सहयोगी संपादक सुयोग आंग्रे, लहू पाटील आणि ॲड. रत्नाकर पाटील यांनी पाहिले. विजेत्यांना जिल्हा परिषद सदस्य अमित नाईक, ॲड. प्रवीणदादा ठाकूर, ज्येष्ठ पत्रकार आविष्कार देसाई, हाशिवरे हायस्कूलचे मुख्याध्यापक बी. बी. गायकवाड, माजी सरपंच रणजित पाटील, बालनाथ धोंदरे, आशाबाई पाटील, गणेश म्हात्रे, प्रवीण पाटील आणि नरेंद्र पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व पारितोषिके प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री समर्थ विचार फाउंडेशन रायगडचे अध्यक्ष ॲड. रत्नाकर पाटील यांनी केले. निलेश ठाकूर यांनी आपल्या नेहमीच्या रंगतदार आणि मनमिळाऊ शैलीत सूत्रसंचालन करून संपूर्ण कार्यक्रमात अधिक रंगत आणली, तर ॲड. विजय पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. या संपूर्ण स्पर्धेच्या व कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी फाउंडेशनचे सर्व आदरणीय पदाधिकारी आणि एकविरा मित्र मंडळाच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

संपादक उमाजी म. केळुसकर
संपादक उमाजी म. केळुसकरhttp://kokannama.in
सा. कोकणनामा या वृत्तपत्राचे संपादक, साहित्यिक उमाजी म. केळुसकर हे गेली ४० वर्षे पत्रकारितेत आहेत. कथा, कादंबरी, ललितलेख, गूढकथा, ऐतिहासिक कथा, बालकथा, कविता, नाटक आदी त्यांची २० पुस्तके प्रकाशित झाली आहेत. या पुस्तकांसह साहित्य आणि पत्रकारिता क्षेत्रातील निर्भीड आणि रचनात्मक कार्याबद्दल राज्यातील विविध संस्थांतर्फे त्यांना पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

error: Content is protected !!