अलिबाग, कोकणनामा वृत्त- रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील किहीम ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच तथा सक्रिय सामाजिक कार्यकर्ते प्रसाद उर्फ पिंट्या सुधीर गायकवाड यांच्या चोंढी येथीस निवासस्थानी मंगळवार, २९ सप्टेंबर रोजी साखरचौथ गणेशाची पारंपरिक पद्धतीने प्रतिष्ठापना करण्यात आली. बाप्पाच्या आगमनामुळे गायकवाड यांच्या निवासस्थानी उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
सरपंच प्रसाद (पिंट्या) गायकवाड हे अलिबाग परिसरात आपल्या सामाजिक आणि राजकीय उपक्रमांसाठी विशेष ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली किहीम परिसरात अनेक महत्त्वपूर्ण विकासकामांना गती मिळाली आहे. विशेषतः, चोंढी पूल ते सातीर्जे गावाकडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण आणि रस्ते सुधारणांची कामे त्यांनी आपल्या विशेष पुढाकाराने पूर्ण करून नागरिकांचा प्रवास सुकर केला आहे.
पायाभूत सुविधांच्या विकासासोबतच त्यांनी आदिवासी महिलांच्या अडीअडचणी सोडवून त्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी मोलाचे कार्य केले आहे. तसेच, पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धनाचे विविध उपक्रमही त्यांनी यशस्वीपणे राबवले आहेत. मराठा समाजातील एक तरुण व आक्रमक नेतृत्व म्हणून ते समाजकार्यात अग्रेसर असून, मराठा समाजाच्या विविध सामाजिक उपक्रमांना व संघटनात्मक कार्याला ते नेहमीच स्थानिक पातळीवर सक्रिय सहकार्य करत असतात.
‘पिंट्या गायकवाड मित्र मंडळ’च्या माध्यमातून ते अलिबाग परिसरातील सर्वसामान्य नागरिकांशी आणि तरुणांशी सतत संपर्कात असतात. या मंडळाच्या माध्यमातून विविध लोकोपयोगी, शैक्षणिक आणि सार्वजनिक कार्ये सातत्याने पार पाडली जातात. साखरचौथ गणेशाच्या प्रतिष्ठापनेनिमित्त त्यांच्या निवासस्थानी विविध क्षेत्रातील मान्यवर आणि ग्रामस्थांनी बाप्पाचे दर्शन घेऊन सदिच्छा भेट दिली.
