Friday, October 9, 2026
Homeकोकणस्वीय सचिवाच्या लाचप्रकरणी शेकापचे बाळराम पाटील यांनी मागितला रायगड जिल्हा परिषद अध्यक्षांचा...

स्वीय सचिवाच्या लाचप्रकरणी शेकापचे बाळराम पाटील यांनी मागितला रायगड जिल्हा परिषद अध्यक्षांचा राजीनामा

पनवेल, कोकणनामा वृत्त- रायगड जिल्हा परिषद अध्यक्षांच्या स्वीय सचिवाला एका महिला शिक्षिकेच्या बदलीसाठी दीड लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडल्याने संपूर्ण प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. योगेश प्रकाश भस्मे असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या स्वीय सचिवाचे नाव असून, तो मूळचा वित्त विभागातील कर्मचारी आहे. या गंभीर घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून जिल्हा परिषद अध्यक्षांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी ठाम मागणी शेतकरी कामगार पक्षाचे (शेकाप) माजी आमदार बाळाराम पाटील यांनी केली असून, या कारवाईमुळे रायगड जिल्हा परिषदेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

योगेश भस्मे यांच्याकडे वित्त विभागाची जबाबदारी असताना त्यांच्याकडे अध्यक्षांचे स्वीय सचिव म्हणून काम करण्याची धुरा कशी आली, हा पहिला मोठा प्रश्न आहे. महिला शिक्षिकेच्या बदली प्रकरणाशी थेट संबंध नसताना वित्त विभागातील कर्मचाऱ्याचा या प्रकरणात प्रवेश कसा झाला, याविषयी आता चर्चा रंगू लागली आहे. एसीबीच्या कारवाईनंतर ही दीड लाखांची रक्कम नेमकी कोणासाठी मागितली गेली होती? भस्मे यांनी हा व्यवहार स्वतःच्या फायद्यासाठी केला की यामागे आणखी कोणाचे वरदहस्त किंवा आदेश होते? यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे शोधणे आता तपासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे.

या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती केवळ एका व्यक्तीपुरती मर्यादित आहे की यामागे एखादी मोठी साखळी सक्रिय आहे, याचा उलगडा एसीबीच्या सखोल चौकशीनंतरच होणार आहे. शिक्षिकेचा बदलीचा अर्ज कोणत्या स्तरावर प्रलंबित होता, त्यावर कोणत्या अधिकाऱ्यांची स्वाक्षरी किंवा शिफारस आवश्यक होती आणि फाईलची हालचाल नेमकी कशी झाली, या सर्व तांत्रिक बाबींची कसून चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे. बदलीसारख्या संवेदनशील विषयामध्ये अनधिकृत हस्तक्षेप होत असल्याचा संशय या निमित्ताने बळावला असून, जिल्हा परिषदेतील निर्णयप्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह लागले आहे.

माजी आमदार बाळाराम पाटील यांनी शिक्षिकेच्या बदलीसंदर्भातील विषय प्रशासकीय विभागाशी निगडित असताना अध्यक्षांच्या स्वीय सचिवाने यामध्ये हस्तक्षेप करण्याची भूमिका का आणि कोणाच्या सांगण्यावरून घेतली, याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे, असे स्पष्ट मत व्यक्त केले आहे. तसेच या व्यवहारामागील पांढरपेशा साखळीचा पर्दाफाश करण्यासाठी या प्रकरणाचा निःपक्षपातीपणे तपास होणे गरजेचे असल्याचे त्यांनीम्हटले आहे.

एसीबीला भस्मे यांच्याकडून मिळालेली माहिती, कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे यांच्या आधारे या प्रकरणाचा तपास आता कोणत्या दिशेने पुढे सरकतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या कारवाईमुळे केवळ एका लाचखोर कर्मचाऱ्याचा बुरखा फाटलेला नाही, तर जिल्हा परिषदेच्या एकूणच कार्यपद्धतीवर आणि पारदर्शकतेवर मोठा आघात झाला आहे. तपासाची व्याप्ती वाढून यामागील सर्व सत्य बाहेर आल्यास जिल्हा परिषद प्रशासनातील अनेक बाबी उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संपादक उमाजी म. केळुसकर
संपादक उमाजी म. केळुसकरhttp://kokannama.in
सा. कोकणनामा या वृत्तपत्राचे संपादक, साहित्यिक उमाजी म. केळुसकर हे गेली ४० वर्षे पत्रकारितेत आहेत. कथा, कादंबरी, ललितलेख, गूढकथा, ऐतिहासिक कथा, बालकथा, कविता, नाटक आदी त्यांची २० पुस्तके प्रकाशित झाली आहेत. या पुस्तकांसह साहित्य आणि पत्रकारिता क्षेत्रातील निर्भीड आणि रचनात्मक कार्याबद्दल राज्यातील विविध संस्थांतर्फे त्यांना पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

error: Content is protected !!