अलिबाग, कोकणनामा वृत्त- पर्यावरण संवर्धनाचा संदेश घराघरात पोहोचविण्याच्या उद्देशाने लायन्स क्लब ऑफ अलिबाग–मांडवा आयोजित आणि पीएमजेएफ ला. अनिल म्हात्रे पुरस्कृत निसर्गस्नेही गणपती मूर्ती व सजावट स्पर्धा अत्यंत उत्साही आणि उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडली. या स्पर्धेसाठी प्राप्त झालेल्या प्रवेशिकांमधून एकूण सोळा स्पर्धकांची प्रत्यक्ष पाहणीसाठी निवड करण्यात आली होती. परीक्षकांनी प्रत्येक स्पर्धकाच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन गणपती मूर्ती, सजावट तसेच निसर्गस्नेही साहित्याचा वापर यांची सूक्ष्म पाहणी करून गुणांकन केले.
या स्पर्धात्मक उपक्रमात फकीरपाडा येथील रवींद्र बाबू वाघमारे यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर बोरीस येथील चंद्रकांत अनंत पाटील यांनी द्वितीय आणि मापगाव येथील मिलिंद चंद्रकांत काठे यांनी तृतीय क्रमांक मिळवला. तसेच नितेश राजाराम घरत (बहिरोळे), साहिल रवींद्र पेढवी (नांदाईपाडा) आणि श्री. योगेश प्रकाश वार्डे (रांजणपाडा) यांना उत्तेजनार्थ बक्षिसे जाहीर करण्यात आली.
या स्पर्धेचे परीक्षण एमजेएफ लायन प्रदीप पाटील, एमजेएफ लायन अभिजीत गुरव, लायन सतीश म्हात्रे, लायन सुधीर पुरो आणि लायन प्रीती पाटील या मान्यवरांनी अत्यंत पारदर्शक पद्धतीने पार पाडले. निसर्गस्नेही गणेशोत्सवाची संकल्पना नागरिकांपर्यंत यशस्वीरीत्या पोहोचविणाऱ्या सर्व सहभागी स्पर्धकांचे क्लबतर्फे अभिनंदन करण्यात आले असून, प्रत्यक्ष पाहणीसाठी वेळ देणाऱ्या सर्व परीक्षकांचेही मनःपूर्वक आभार मानण्यात आले. स्पर्धेला मिळालेला हा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, पुढील वर्षी ही स्पर्धा आणखी भव्यदिव्य स्वरूपात आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा लायन्स क्लब ऑफ अलिबाग–मांडवातर्फे करण्यात आली आहे. दरम्यान, बक्षीस समारंभाची तारीख, वेळ व ठिकाण याची माहिती विजेत्या स्पर्धकांशी संपर्क साधून लवकरच स्वतंत्रपणे कळविण्यात येणार आहे.
