रायगडमधून तीन हजार कार्यकर्ते मुंबईत धडकणार; शेकाप नेते जयंत पाटील यांची माहिती
अलिबाग, कोकणनामा वृत्त- निवडणूक आयोगाची कार्यपद्धती आणि मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेविरोधात ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाखाली मुंबईत एका भव्य संयुक्त मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या महत्त्वाच्या आंदोलनाला शेतकरी कामगार पक्षाने (शेकाप) संपूर्ण पाठिंबा जाहीर केला असून, रायगड जिल्ह्यातून तीन हजारांहून अधिक कार्यकर्ते रविवारी (दि. ४) मुंबईत धडकणार आहेत. याबाबतची सविस्तर माहिती शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी आज (शनिवारी, दि. ३) अलिबाग येथे आयोजित केलेल्या एका विशेष पत्रकार परिषदेमध्ये दिली.
या पत्रकार परिषदेला शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, कामगार आघाडी प्रमुख प्रदीप नाईक, तालुका चिटणीस सुरेश घरत, शेकाप जिल्हा चिटणीस मंडळाचे सदस्य अनिल पाटील, माजी तालुका चिटणीस अनिल पाटील, शेतकरी संघटनेचे अनिल गोमा पाटील, निलेश खोत, सुरेश पाटील, तालुका सहचिटणीस नरेश म्हात्रे, तसेच रायगड बाजारचे उपाध्यक्ष प्रमोद घासे यांसह पक्षाच्या विविध आघाड्यांचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी संवाद साधताना जयंत पाटील यांनी देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. देशात सध्या मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ घातला जात असून जाणीवपूर्वक मतदारांची नावे कमी करण्याचा घाट रचला जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. विशेषतः विरोधकांचे मतदार कमी करण्याचे सुनियोजित प्रयत्न सुरू असून, या सर्व गैरप्रकारांमध्ये निवडणूक आयोगदेखील सामील असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. निवडणूक आयोग आपली ताकद वापरून एकतर्फी राजकीय वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावाही त्यांनी या वेळी केला.
निवडणूक आयोगाच्या या एकतर्फी कार्यपद्धतीविरोधात आणि एसआयआर प्रक्रियेतील पारदर्शकतेच्या अभावामुळे हा लढा ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आला आहे. विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होणार असून, शेतकरी कामगार पक्षानेदेखील या ऐतिहासिक लढ्यात सहभागी होण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. रविवारी (दि. ४) सकाळी साडेअकरा वाजता या आंदोलनाला सुरुवात होणार असून, रायगड जिल्ह्यातून जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी यात सहभाग घ्यावा, यासाठी सर्व आवश्यक ते नियोजन पूर्ण करण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अलिबाग तालुक्यासह पनवेल आणि जिल्ह्यातील इतर विविध भागांतील असंख्य कार्यकर्ते या मोर्चात अत्यंत उत्साहाने सहभागी होणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
सध्या देशात आणि राज्यामध्ये १९७५ मधील आणीबाणीसदृश परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसत आहे, असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले. निवडणूक आयोगाची कार्यपद्धती आणि मतदार याद्यांमधील या गंभीर त्रुटींविरोधात संपूर्ण राज्यभर असंतोषाची लाट उफाळून आली असून, सरकार आणि प्रशासनाच्या या भूमिकेविरोधात आता सर्वसामान्य जनता स्वतः रस्त्यावर उतरू लागली आहे. उद्याच्या या भव्य मोर्चात रायगड जिल्ह्यातून तीन हजारांहून अधिक कार्यकर्ते सहभागी होणार असून, जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आंदोलनाला बळ द्यावे, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले.
या पत्रकार परिषदेत बोलताना शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनीदेखील सरकार आणि निवडणूक आयोगाच्या धोरणांवर कडाडून टीका केली. नागरिकांचे हक्काचे मताधिकार जाणीवपूर्वक काढून घेतले जात असून विरोधकांचे मतदार याद्यांमधून पद्धतशीरपणे नाव वगळले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. विशिष्ट जाती आणि धर्माची मते कमी करण्याचा घाट रचला जात असून, सर्वसामान्य आणि मागास घटकांना मतदानाच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचा सुनियोजित प्रयत्न सुरू आहे, असे त्या म्हणाल्या. हरकती व दावे नोंदवण्यासाठी मतदारांना ज्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत, त्यावरील दाव्यांचा कालावधी अत्यंत अल्प ठेवण्यात आला आहे. सरकारी यंत्रणेमार्फत राबवली जाणारी ही मोहीम अत्यंत चुकीची आणि लोकशाहीविरोधी असल्याचे सांगत त्यांनी ज्ञानेश कुमार यांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, तसेच त्यांच्याविरोधात योग्य ती कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी केली.
