Friday, October 9, 2026
Homeसंपादकीयजीवनयात्रा आनंदाची...  तिमिरातुनी तेजाकडे 

जीवनयात्रा आनंदाची…  तिमिरातुनी तेजाकडे 

प्रा. शाम जोगळेकर / पुस्तक परिचय

‌‘तिमिरातुनी तेजाकडे‌’ हे ॲड. स्वाती कुलकर्णी यांचे पुस्तक संजय कुलकण यांनी प्रकाशित केले आहे. मनोगतमध्ये स्वाती यांनी आपल्या पहिल्या पुस्तकाची निर्मिती कशी झाली, हे सविस्तरपणे मांडले आहे. एप्रिल,2 022 मध्ये त्यांच्या टॉन्सिल्सच्या कॅन्सरचे निदान झाले. कॅन्सरमधून बऱ्या होण्याच्या, या खडतर प्रवासाचा मागोवा  पुस्तकात घेतला आहे. नांदेडचे सुप्रसिद्ध, डॉ. नंदू मुलमुले यांनी हे पुस्तक वाचून आपला समर्पक अभिप्राय दिला आहे. त्यानुसार, त्यांचा प्रांजळपणा, त्यांच्या स्वभावाला असलेली नर्मविनोदाची डूब, कॅन्सरच्या उपचारात त्यांच्या वाट्याला आलेले अनुभव आणि त्यावेळी जाणवलेली चिंता, भीती, काळजी, औदासिन्य त्यावर मनाने काढलेला मार्ग, सारे काही त्या प्रांजळपणे कथन करतात. 

जीवनाकडे नर्मविनोदी खेळकर वृत्तीने पाहण्याच्या त्यांच्या वृत्तीचे त्यांनी कौतुक केले आहे. बारा प्रकरणांतून  पुस्तक वाचकांसमोर उलगडते. अद्वैत कुलकर्णी यांचे रंगीत मुखपृष्ठ समर्पक आहे. सलिल थिटे यांची पुस्तकातील समाविष्ट, रेखाचित्रे उत्तम झाली आहेत.

‌‘आज अचानक गाठ दिसे‌’ या पहिल्या प्रकरणात, कोर्टातील कामाचे टायपिंग करायला, ॲड. स्वाती गेल्या होत्या. त्यावेळी, 29 मार्च 2022 रोजी त्यांना, गळ्याखाली घट्ट, गोलाकार, बोराएवढी गाठ असल्याचे जाणवले. न दुखणारी गाठ डॉक्टरना दाखवण्यास सुरुवात झाली. विविध तपासण्यानंतर गाठ काढली गेली. त्या गाठीची तपासणी केल्यानंतर विविध रिपोर्ट आले. अंतिम रिपोर्ट कॅन्सर नसल्याचा येईल, असे सर्वांना वाटत होते. परंतु जेव्हा त्याविषयी घरातील कोणी बोलत नव्हते, तेव्हा स्वाती यांना काळजी वाटू लागली. कॅन्सर झाल्याचे समजल्यानंतर, वयाच्या 54 व्या वष, मरण येईल की काय, असे वाटायला लागले. स्वाती यांच्या मनात विचारचक्र सुरू झाले. कॅन्सरचे ऑपरेशन मुंबईतील कुलाबा येथील एच.सी.जी. खुबचंदानी कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये करण्याचे, कुटुंबीयांनी निश्चित केले. त्याप्रमाणे 23 मे रोजी हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतरचे विविध अनुभव स्वाती यांनी ‌‘तुम आशा विश्वास हो हमारे‌’ या प्रकरणात सविस्तरपणे मांडले आहेत. आतापर्यंतच्या जीवनाविषयी वाटलेले समाधान त्यांनी नेमकेपणाने व्यक्त केले आहे. कॅन्सरवर मात केल्यानंतर, पुन्हा नव्याने जीवन सुरू होईल, अशी आशा त्यांना वाटत होती. ‌‘हम होंगे कामयाब एक दिन‌’ या प्रकरणामध्ये  रेडिएशन, केमोथेरपी घेताना आलेले, विविध अनुभव स्वाती यांनी, सविस्तरपणे, समर्पक शब्दात मांडले आहेत. ते वाचताना आधुनिक वैद्यकशास्त्राची प्रगती आणि आजारातून बरे होऊ पाहणाऱ्या रुग्णांना सहन करावे लागणारे कष्ट, वेदना हे जाणवते. ते वाचताना डोळे नकळत पाझरू लागतात.

‌‘मनका विश्वास कमजोर हो ना‌’ या प्रकरणात कॅन्सरविषयी स्वाती यांनी सविस्तरपणे लिहिले आहे. कॅन्सर म्हणजे मृत्यू, हे बहुतेकांच्या मनात पक्के असते. त्यामुळे रुग्णाबरोबरच नातेवाईक आणि मित्रपरिवार घाबरून जातो. परंतु अत्याधुनिक वैद्यकीय संशोधनातून केमोथेरपी, रेडिएशन यांचा प्रभावी उपाय असल्याने, कॅन्सर रुग्ण बरे होऊ शकतात. मात्र ही सारी प्रक्रिया खर्चिक आणि रुग्णांप्रमाणेच त्यांच्या नातेवाईकांना थकवणारी असते. कॅन्सर हा आजार कोणालाही केव्हाही होऊ शकतो. ॲड.ॲड.पोषक आहाराचा अभाव, चुकीची आहारपद्धती, तंबाखू, गुटखा सेवन, धूम्रपान, मद्यपान, शारीरिक हालचालींचा अभाव, लठ्ठपणा, काही घातक रसायनांच्या संपर्कात राहणे अशा विविध कारणांमुळे कॅन्सरची शक्यता वाढते. कॅन्सर रुग्णांच्या बाबतीत वैद्यकीय उपचारांप्रमाणेच,  मानसिक आरोग्य टिकविण्यासाठी काळजी घ्यावी लागते. कॅन्सरचे हॉस्पिटलमधील उपचार संपल्यानंतर, घरी आल्यावर पती, मुलगा आणि जवळचे नातेवाईक,  मित्रपरिवार यांनी खाण्यापिण्याकडे, शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे कसे लक्ष पुरविले, ते सविस्तरपणे मांडले आहे. ‌‘हार के बाद ही जीत है‌’ मध्ये, स्वाती यांनी, मे 2023 नंतर, हळूहळू सर्व दैनंदिन व्यवहार, तब्येत सुधारल्यामुळे कसे करता येऊ लागले, ते स्पष्ट केले आहे. श्रावणात अलिबागच्या मनस्विनी या स्त्रियांच्या गटातील मंगळागौरीच्या कार्यक्रमात त्यांनी भाग घेतला. कार्यक्रमाच्या निवेदनाबरोबरच त्यांचे गाणेही छान झाले. परिणामी  राज्यव्यापी स्पर्धेमध्ये, मुंबईला त्यांच्या गटाला दुसरे पारितोषिक प्राप्त झाले. त्याआधी त्यांनी पंढरपूरच्या वारीमध्ये आपला सहभाग, अंशतः नोंदविला होता. नंतर गणपतीचा सण, त्यांच्या घरी सर्व नातेवाईकांसह साजरा झाला. 

कॅन्सर म्हणजे जीवनमरणाची लढाई समजली जाते. त्यामुळे आधुनिक वैद्यकीय उपचारांप्रमाणेच, अन्य वैद्यकीय उपायही रुग्ण घेण्यास उद्युक्त होतो. स्वाती यांनी आयुर्वेदतज्ज्ञ यांनी सुचविलेली औषधे घेतली होती. रेकीचा आधारही घेतला होता. परिशिष्टामध्ये स्वाती यांनी ‌‘आधार रेखा प्रतिष्ठान‌’ या सेवाभावी संस्थेची सविस्तर माहिती दिली आहे. भावी काळात या संस्थेला मदत करण्याचा त्यांनी संकल्प केला आहे. सर्वसामान्य मध्यमवगय कुटुंबाला कॅन्सरच्या आजाराचा मुकाबला करण्यासाठी लागणारा मोठा खर्च झेपणारा नसतो. आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांसाठी, सरकार तसेच विविध समाजसेवी संस्था मदत करतात. अशा सेवाभावी संस्थांना आर्थिक आणि अन्य प्रकारची, यथाशक्य मदत करणे, हे सर्व सुजाण नागरिकांचे कर्तव्य आहे, याचीही जाणीव स्वाती यांनी करून दिली आहे.

स्वाती यांनी या पुस्तकाद्वारे कॅन्सरशी लढा देतानाचे सविस्तर अनुभव विलक्षण पद्धतीने, जीवनाविषयी खेळकर दृष्टिकोन ठेवून मांडल्यामुळे हे पुस्तक नितांत वाचनीय आणि संग्राह्य ठरते. साहित्य, संगीत आणि विनोदाच्या आधाराने रुग्णाचे मानसिक आरोग्य सुधारण्यास कशी मदत होते, हे या पुस्तकाद्वारे समजते. स्वाती यांनी कॅन्सरच्या ज्ञात इतिहासाचा, पुस्तकात उल्लेख करायला हवा होता. या पुस्तकाच्या विक्रीतून मिळणारे उत्पन्न, कॅन्सरसंबंधी विधायक कार्य करणाऱ्या ‌‘आधार रेखा प्रतिष्ठान, ठाणे‌’ या सेवाभावी संस्थेला देण्याचा संकल्प त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे, हे विशेष!

पुस्तकाचे नाव : तिमिरातुनी तेजाकडे 

लेखिका : ॲड. स्वाती कुलकर्णी

प्रथम आवृत्ती : 2026

प्रकाशक : संजय कुलकण, अलिबाग.

              9420056688

पृष्ठे 187.  मूल्य रु. 350/-

संपादक उमाजी म. केळुसकर
संपादक उमाजी म. केळुसकरhttp://kokannama.in
सा. कोकणनामा या वृत्तपत्राचे संपादक, साहित्यिक उमाजी म. केळुसकर हे गेली ४० वर्षे पत्रकारितेत आहेत. कथा, कादंबरी, ललितलेख, गूढकथा, ऐतिहासिक कथा, बालकथा, कविता, नाटक आदी त्यांची २० पुस्तके प्रकाशित झाली आहेत. या पुस्तकांसह साहित्य आणि पत्रकारिता क्षेत्रातील निर्भीड आणि रचनात्मक कार्याबद्दल राज्यातील विविध संस्थांतर्फे त्यांना पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

error: Content is protected !!