-उमाजी म. केळुसकर / वास्तव
भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या पावन मुहूर्तावर घरोघरी आणि सार्वजनिक मंडपांत श्री गणेशाचे आगमन झाले आहे. गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने, टाळ-मृदुंगाच्या गजर आणि धूप-दीप, आरतीच्या दरवळाने आसमंत उजळून निघाला आहे. महाराष्ट्रात गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून तो लोकजीवनाचा आत्मा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून धार्मिक परंपरेचा भाग असलेला हा उत्सव लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक स्वरूपात आणला. त्यामागचा हेतू अत्यंत उदात्त होता. पारतंत्र्याच्या काळात बहुजन समाजाला एकत्र आणणे, राष्ट्रनिर्मितीचे विचार रुजवणे, कला-संस्कृतीचे जतन करणे आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद निर्माण करणे, हा सार्वजनिक गणेशोत्सवाचा मुख्य गाभा होता. दुर्दैवाने, काळाच्या ओघात लोकमान्यांच्या या स्वप्नातील उत्सवाचे रूप पार बदलून गेले आहे. आजचा गणेशोत्सव आणि मूळ संकल्पना यांचा दूरवरही संबंध उरलेला नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक जीवनात गणेशोत्सवाला अत्यंत अनन्यसाधारण महत्त्व आहे. भाद्रपद शुद्ध चतुथला श्रीगणेशाची घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये होणारी प्रतिष्ठापना ही केवळ एका सणाची सुरुवात नसते, तर तो संपूर्ण समाजाचा एक महाउत्सव असतो. घरगुती गणेशोत्सवातील भक्तिभाव, आपुलकी आणि कौटुंबिक जिव्हाळा जसा मनाला स्पर्शून जातो, तसाच सार्वजनिक गणेशोत्सवातील उत्साह, एकता आणि कलागुणांना मिळणारे व्यासपीठ संपूर्ण वातावरण चैतन्यमय करून टाकते. श्रीगणेश हा केवळ विघ्नहर्ता नाही, तर तो 64 कला आणि 14 विद्यांचा अधिपती, म्हणजेच ‘बुद्धिदाता’ आहे. अशा या ज्ञान आणि बुद्धीच्या देवतेचा उत्सव साजरा करताना त्यातील धार्मिक पावित्र्य, सांस्कृतिक वारसा आणि सामाजिक भान टिकवून ठेवणे हे प्रत्येक नागरिकाचे आद्य कर्तव्य आहे.
गणेशोत्सवाचा इतिहास पाहिला, तर लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात एका विशिष्ट ध्येयाने केली होती. परकीय इंग्रजी राजवटीविरुद्ध जनतेला संघटित करणे, लोकांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना रुजवणे आणि समाजातील सर्व घटकांना एकत्र आणणे हा त्यामागील मुख्य उद्देश होता. स्वातंत्र्योत्तर काळातही सार्वजनिक गणेशोत्सवाने अनेक समाजोपयोगी कार्ये केली आहेत. आजही गणेशोत्सवाची ही सकारात्मक आणि उज्ज्वल बाजू आपण नाकारू शकत नाही. अनेक गणेशोत्सव मंडळे या दहा दिवसांत रक्तादान शिबिरे, मोफत आरोग्य तपासणी, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, पर्यावरण संवर्धनाचे उपक्रम आणि सामाजिक प्रबोधनावरील देखावे सादर करतात. महाराष्ट्राची पारंपरिक लोककला, जसे की झांजपथक, ढोल-ताशा पथके, लेझिम आणि भजन-कीर्तन यांसारख्या कलांना गणेशोत्सवामुळेच मोठे पुनरुज्जीवन मिळाले आहे. तरुण पिढी या पथकांच्या माध्यमातून शिस्त, श्रमदान आणि संस्कृतीशी जोडली जाते, ही अत्यंत कौतुकास्पद आणि सकारात्मक बाब आहे.
परंतु, दुसऱ्या बाजूला गेल्या काही दशकांत या उत्सवाचे स्वरूप ज्या वेगाने बदलत गेले आहे, ते अत्यंत चिंताजनक आहे. भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक प्रबोधनाची जागा आता प्रचंड भपका, व्यावसायिकता आणि शक्तिप्रदर्शनाने घेतली आहे. विशेषतः विसर्जन मिरवणुकांमध्ये पसरलेली विकृती ही बुद्धीच्या देवतेचा आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अवमान करणारी ठरत आहे. उत्सवातील भक्ती आणि पावित्र्य बाजूला राहून तिथे डीजेचा कर्णकर्कश आवाज, डोळ्यांना त्रासदायक ठरणारे घातक लेझर किरणे आणि अश्लील किंवा उत्तान गाण्यांवर होणारा नाच यांचा शिरकाव झाला आहे. ज्या देवतेला आपण ज्ञानाची आणि संयमाची मूर्त मानतो, त्या देवतेच्या उत्सवात असा गोंधळ आणि अश्लीलता कशी काय खपवून घेतली जाऊ शकते? बुद्धिदात्या गणेशाला हे चित्र नक्कीच क्लेशदायक वाटत असणार, यात शंका नाही.
डीजेच्या प्रचंड आवाजामुळे होणारे ध्वनीप्रदूषण केवळ कानांना त्रास देत नाही, तर ते लहान मुले, वृद्ध, आजारी व्यक्ती आणि प्राण्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरत आहे. अनेक ठिकाणी विसर्जन मिरवणुकीतील अतिआवाजामुळे हृदयविकाराचा झटका येऊन नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या दुर्घटना घडल्या आहेत. लेझरच्या तीव्र किरणांमुळे अनेक तरुण आणि लहान मुलांच्या डोळ्यांना कायमची हानी पोहोचल्याच्या बातम्या दरवर्षी समोर येतात. आनंदाच्या नावाखाली दुसऱ्यांच्या जीवाला आणि आरोग्याला धोक्यात आणणे, हा कोणता उत्सव आणि कोणता धर्म? विसर्जन मिरवणुकांमध्ये ज्या प्रकारे चित्रपटसृष्टीतील अश्लील गाणी, मद्यधुंद अवस्थेतील धिंगाणा आणि अभिरुचीहीन वर्तन पाहायला मिळते, ते पाहून गणेशोत्सवाचा मूळ उद्देशच हरवला आहे की काय, असा प्रश्न पडतो.
या नकारात्मक आणि विकृत बाबींवर वेळीच अंकुश ठेवला नाही, तर गणेशोत्सवाचे मूळ स्वरूप आणि गांभीर्य पूर्णपणे नष्ट होईल. उत्सव साजरा करण्यावर कोणाचाही आक्षेप नाही; उलटपक्षी उत्साह आणि आनंद असायलाच हवा. मात्र, त्या उत्साहाला जेव्हा विवेकाची जोड नसते, तेव्हा तो आनंद न राहता उपद्रव बनतो. गणेशोत्सवातील पावित्र्य आणि सामाजिक भान पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी समाज, गणेशोत्सव मंडळे आणि प्रशासन या तिघांनाही एकत्र येऊन गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
प्रशासनाने ध्वनीप्रदूषण आणि लेझरच्या वापरावर कडक कायदेशीर कारवाई करणे आवश्यक आहे. केवळ कागदावर नियम न ठेवता, प्रत्यक्ष मिरवणुकीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. परंतु, केवळ कायद्याने किंवा पोलिसांच्या धाकाने हा बदल घडणे शक्य नाही. यासाठी गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी स्वयंशिस्त पाळणे सर्वाधिक महत्त्वाचे आहे. मंडळांनी एकत्र येऊन डीजे आणि लेझरला पूर्णपणे फाटा देण्याचा संकल्प केला पाहिजे. आपल्या पारंपरिक ढोल-ताशा, झांज आणि पारंपरिक वाद्यांचा गजर मिरवणुकीची शोभा वाढवण्यासाठी पुरेसा आहे.
त्याचप्रमाणे, विसर्जन मिरवणुकांमध्ये गायली जाणारी गाणी, वाजवली जाणारी संगीत रचना आणि केला जाणारा नाच हा सभ्य आणि उत्सवाच्या धार्मिकतेला साजेसा असावा. भक्तीगीते, पोवाडे, लोकगीते आणि देशभक्तीपर गाण्यांच्या माध्यमातूनही मिरवणुकीत अभूतपूर्व उत्साह निर्माण करता येतो. मंडळांनी देखाव्यांच्या माध्यमातून चालू सामाजिक विषयांवर, जसे की पर्यावरण रक्षण, व्यसनमुक्ती, महिला सुरक्षा आणि शिक्षण, यांवर प्रबोधन करण्यावर भर दिला पाहिजे.
घरगुती गणेशोत्सवात ज्याप्रमाणे एक शांतता, पावित्र्य आणि कौटुंबिक जिव्हाळा असतो, तसाच आदर आणि संयम सार्वजनिक उत्सवातही दिसला पाहिजे. समाज म्हणून आपण कुठल्या दिशेने जात आहोत, याचा पुनर्विचार करण्याची हीच ती वेळ आहे. उत्सव हा समाजाला जोडणारा, आनंद देणारा आणि विचारांची प्रगती करणारा असावा; समाजात त्रास, प्रदूषण आणि अश्लीलता पसरवणारा नसावा. या गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपण सर्वांनी मिळून बुद्धीच्या देवतेला अभिप्रेत असणारा, पावित्र्य जपणारा, पर्यावरणाचा रक्षण करणारा आणि सामाजिक भान ठेवणारा उत्सव साजरा करण्याचा निर्धार करूया. हेच श्रीगणेशाच्या चरणी खरे आणि खऱ्या अर्थाने समर्पक वंदन ठरेल.
