-उमाजी म. केळुसकर / वास्तव
रायगड जिल्ह्याला लाभलेली विस्तीर्ण समुद्रकिनाऱ्यांची देणगी आणि कोकणातील निसर्गाचे सौंदर्य पर्यटकांना नेहमीच खुणावत असते. परंतु, गुरुवारी, १ ऑक्टोबर रोजी श्रीवर्धन तालुक्यातील प्रसिद्ध दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर घडलेली दुर्दैवी घटना मनाला सुन्न करणारी आणि संपूर्ण समाजाला आरसा दाखवणारी आहे. आळंदी येथील ‘विनर्स अॅकडमी’चे विद्यार्थी सहलीसाठी आले असताना समुद्राच्या अथांग पाण्यात बुडून आठ विद्यार्थी मृत्यू पावले. ही केवळ एक दुर्घटना नाही, तर आपल्या एकूणच सामाजिक बेफिकीर वृत्तीचे, प्रशासकीय यंत्रणेच्या मर्यादांचे आणि निसर्गाशी करताना विनाशाच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या अतिउत्साहाचे एक भीषण वास्तव आहे. एकाच वेळी आठ तरुण जिवांना जलसमाधी मिळावी, यासारखी वेदनादायी घटना कोणतीही असू शकत नाही. या घटनेने मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळलाच आहे, परंतु संपूर्ण राज्याला विचार करायला भाग पाडले आहे की, आपल्या आनंदाच्या क्षणांचे रूपांतर अवघ्या काही सेकंदांत शोकसागरात कसे होते?
या संपूर्ण घटनेचा सखोल विचार करताना एक गोष्ट अत्यंत ठळकपणे अधोरेखित करावीशी वाटते आणि ती म्हणजे कोणताही समुद्र वा समुद्रकिनारा कधीही धोकादायक नसतो. निसर्गाने तयार केलेले हे अजस्र जलस्त्रोत त्यांचे नियम पाळून आपल्या सौंदर्याची अनुभूती देतात. खरी भीती किंवा धोका असतो तो पर्यटकांचा अतिउत्साह आणि स्थानिकांच्या किंवा सुरक्षेच्या सूचनांकडे केलेल्या जाणीवपूर्वक दुर्लक्षाचा. समुद्राची अथांगता, त्याची खोली आणि लाटांचे वर्तन हे सर्व शास्त्राशी आणि निसर्गाच्या नियमांशी जोडलेले आहे. मात्र जेव्हा पर्यटक समुद्रात उतरतात, तेव्हा त्यांना समुद्राच्या पोटात दडलेल्या अदृश्य खड्ड्यांच्या आणि पाण्याच्या तीव्र प्रवाहाची कल्पना नसते. पावसाळ्यात वा वाऱ्याच्या दिवसांत किनाऱ्यालगतच्या वाळूमध्ये होणारे बदल आणि पावासाळ्यामुळे निर्माण होणारे पाण्याचे खड्डे हे अनेकदा डोळ्यांना दिसत नाहीत. अशा वेळी तरुणाईच्या अफाट उत्साहात तरुण वर्ग भान हरपून समुद्रात खोलवर निघून जातो. स्थानिक नागरिक, जीवरक्षक किंवा सुरक्षा यंत्रणा वारंवार सूचना देत असतात, फलक लावलेले असतात, तरीही ‘आम्हाला पोहता येते’ या गर्वात किंवा ‘आमचे काहीच होणार नाही’ या आत्मविश्वासात त्या सूचनांकडे दुर्लक्ष केले जाते. हे दुर्लक्षच अनेकदा प्राणघातक ठरते.
निसर्गाची सलगी ही कधीही बळजोरीने करायची नसते. ती अत्यंत हळुवारपणे करायची असते. समुद्राशी मैत्री करताना त्याच्या मर्यादा ओळखणे अत्यंत गरजेचे असते. आपण समुद्राच्या अथांग शक्तीसमोर कुचकामी आहोत हे विसरून चालत नाही. परंतु आजची तरुण पिढी किंवा पर्यटकांचे लोंढे निसर्गाला आपले क्रीडांगण समजून वागतात. किनाऱ्यावर सेल्फी काढणे, धोक्याच्या सूचनेकडे पाठ करून पाण्यात उतरणे ही आजच्या पर्यटन संस्कृतीची एक विदारक बाजू बनली आहे. दिवेआगरच्या घटनेने पुन्हा एकदा हे सिद्ध केले आहे कि, जर आपण निसर्गाच्या नियमांचा अवमान केला, तर निसर्ग आपली ताकद दाखवल्याशिवाय राहत नाही. ज्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यांसमोर उज्ज्वल भविष्य होते, ज्या पालकांनी आपल्या अपत्यांना मोठ्या अपेक्षेने शिक्षणासाठी आणि सहलीसाठी पाठवले होते, त्यांना केवळ एका क्षणाच्या अविचारापोटी कायमचे मुकावे लागले, ही हानी कधीही भरून न निघणारी आहे.
या दुर्दैवी घटनेच्या अनुषंगाने प्रशासकीय आणि सुरक्षा यंत्रणेच्या भूमिकेचाही गांभीर्याने आढावा घेणे गरजेचे ठरते. रायगड जिल्ह्यातील इतर काही प्रमुख किनाऱ्यांवर प्रशासनाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सुरक्षेला प्राधान्य दिले आहे. उदाहरणार्थ, नागाव आणि काशिद यांसारख्या लोकप्रिय समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक रोबोटिक वॉटरक्राफ्ट पथके पुरवण्यात आली आहेत. या रोबोटिक उपकरणांमुळे समुद्रात बुडणाऱ्या व्यक्तीपर्यंत तात्काळ मदत पोहोचवणे शक्य होते आणि अनेकांचे प्राण वाचले आहेत. जर अशाच स्वरूपाची आधुनिक आपत्कालीन यंत्रणा, रोबोटिक वॉटरक्राफ्ट आणि कडक सुरक्षा गस्ती दिवेआगर किंवा इतर सर्व महत्त्वाच्या किनाऱ्यांवर आधीच लक्ष देऊन पुरवण्यात आली असती, तर कदाचित आज ही प्राणघातक घटना घडली नसती आणि घडली तरी वेळेवर मदत मिळून अनेकांचे प्राण वाचवता आले असते. एखादी दुर्घटना घडल्यानंतर यंत्रणेने जागी होणे आणि तात्पुरती हळहळ व्यक्त करणे याचा नंतर काहीही उपयोग नसतो. दुर्घटना घडण्यापूर्वी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे हीच खरी प्रशासकीय आणि सामाजिक जबाबदारी असते.
दिवेआगरमधील या घटनेने केवळ स्थानिक प्रशासन किंवा एका संस्थेच्या व्यवस्थापनालाच नव्हे, तर राज्यातील संपूर्ण पर्यटन व्यवस्थेला खऱ्या अर्थाने खडबडून जागे केले आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर दररोज हजारो पर्यटक येतात. वीकेंडला किंवा सुट्ट्यांच्या काळात किनाऱ्यांवर अलोट गर्दी उसळते. या गर्दीचे नियंत्रण करणे, प्रत्येक पर्यटकावर वैयक्तिक लक्ष ठेवणे स्थानिक पोलिसांना किंवा मोजक्या जीवरक्षकांना शक्य होत नाही. यासाठी आता किनाऱ्यांच्या संरचनेत आमूलाग्र बदल करण्याची वेळ आली आहे. प्रत्येक धोकादायक समुद्रकिनाऱ्यावर कायमस्वरूपी सुरक्षा चौक्या, प्रशिक्षित जीवरक्षक, अत्याधुनिक गस्त वाहने आणि रोबोटिक वॉटरक्राफ्ट सारखी यंत्रसामग्री अनिवार्य केली पाहिजे. तसेच पर्यटकांना पर्यटनाची शिस्त लावण्यासाठी जनजागृती मोहिमा राबवणे अत्यंत आवश्यक आहे. ज्याप्रमाणे वाहतुकीचे नियम पाळले नाहीत तर दंड होतो, त्याचप्रमाणे समुद्रकिनाऱ्यांवर सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्याची गरज आहे, जेणेकरून पर्यटकांच्या जीवाशी खेळ थांबवता येईल.
शाळा, महाविद्यालयांच्या सहली आणि पालकांनीही या घटनेतून मोठा धडा घेतला पाहिजे. विद्यार्थ्यांच्या सहलींचे आयोजन करताना केवळ मनोरंजनावर भर न देता त्यांच्या सुरक्षिततेची पूर्ण खात्री करणे ही शैक्षणिक संस्थांची नैतिक जबाबदारी असते. अथांग समुद्राच्या सानिध्यात विद्यार्थ्यांना सोडताना योग्य ती मार्गदर्शक तत्त्वे पाळली गेली पाहिजेत. मुले उत्साही असतात, त्यांच्यात धाडस असते, पण त्या उत्साहाला योग्य वशिष्ठाची आणि नियंत्रणाची जोड देण्याचे काम शिक्षकांचे असते. एकाच वेळी शेकडो विद्यार्थ्यांच्या ग्रुपमध्ये प्रत्येकावर नजर ठेवणे कठीण असले, तरी पाण्याचे आकर्षण असणाऱ्या मुलांना समुद्रापासून सुरक्षित अंतरावर ठेवणे शक्य आहे. दुर्दैवाने या प्रकरणात तो समन्वय कमी पडल्याचे दिसून आले आहे.
निसर्गाच्या सानिध्यात आनंदाचे क्षण घालवणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे, पण तो अधिकार बजावताना जबाबदारीचे भान सुटता कामा नये. दिवेआगरच्या समुद्रात बुडून गेलेले ते आठ तरुण परत येऊ शकणार नाहीत, त्यांच्या कुटुंबांचे भरून न निघणारे नुकसान झाले आहे. परंतु, या घटनेवरून जर आपण आज गांभीर्याने बोध घेतला नाही, तर भविष्यात अशाच चुकांमुळे आणखी किती जिवांना बळी जावे लागेल, याची खात्री कोणीही देऊ शकत नाही. शासनाने प्रत्येक किनाऱ्यावर रोबोटिक वॉटरक्राफ्ट आणि कडक सुरक्षा यंत्रणा तातडीने उभी करावी, आणि पर्यटकांनीही स्वतःच्या सुरक्षेची जबाबदारी ओळखून निसर्गाशी खेळणे थांबवावे, हीच या दुर्दैवी घटनेतील मृतांना खरी श्रद्धांजली ठरेल.
