Friday, October 9, 2026
Home Blog Page 6

रायगड जिल्हा मुख्याध्यापक संघटनेची वार्षिक सभा संपन्न

अलिबाग, कोकणनामा वृत्त- रायगड जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सेवानिवृत्त मुख्याध्यापक संघटनेची पाचवी वार्षिक सर्वसाधारण सभा पेझारी येथील संघटनेचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत पाटील यांच्या निवासस्थानी त्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सभेस जिल्ह्यातील अलिबाग, पेण, पनवेल, पाली-सुधागड, कर्जत, मुरुड, रोहा, महाड व पुणे येथून मुख्याध्यापक उपस्थित होते.

सभेच्या प्रारंभी अध्यक्ष श्रीकांत पिटील यांनी सर्व उपस्थित मुख्याध्यापकांचे स्वागत केले.सभेच्या कामकाजाला सुरुवात करण्यापूर्वी दिवंगत मुख्याध्यापिका स्व.भारती हळदवणेकर यांना व अन्य ज्ञात अज्ञातांना श्रद्धांजली वाहण्यात आली. ज्येष्ठ मार्गदर्शक सदस्य पत्रकार बळवंत वालेकर यांनी स्व. हळदवणेकर यांनी केलेले शैक्षणिक,सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील कार्य विषद केले. नंतर‌ संघटना सचिव अजय पाटील यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखविले.

सभेतील चर्चेत कार्याध्यक्ष अ.पा. म्हात्रे, उपाध्यक्ष एस.एम. पाटील, सल्लागार पी.डी. साठे, प्रशांत गायकवाड, अनंत चिनके, रमेश थळे, पी.बी. सावंत, म्हात्रे, संजीवनी जोशी, स्नेहा पाटील, मोहरे यांनी चर्चेत सहभाग नोंदविला. त्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. नंतर संघटनेचे खजिनदार पी.के. पाटील यांनी संस्थेचा जमाखर्च वाचून दाखविला त्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. यावेळी संघटनेची नोंदणी व ऑडिट बद्द्ल सखोल चर्चा झाली. जमाखर्चास सर्वानुमते मंजूरी देण्यात आली.

याच सभेत महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त मुख्याध्यापक संघटनेचे नियोजित पंढरपूर येथील ३० व ३१ ऑक्टोबर रोजीचे राज्यस्तरीय अधिवेशन अथवा स्नेहमेळावा यशस्वी करण्यासाठी रायगडातून मोठ्या संख्येने सेवानिवृत्त मुख्याध्यापकांनी उपस्थिती लावावी, असे आवाहन अध्यक्ष श्रीकांत पाटील व सचिव अजय पाटील यांनी केले. शेवटी सचिव अजय पाटील यांनी आयत्यावेळी कोणतेही विषय नसल्यामुळे अध्यक्षांच्या परवानगीने आभार मानून सभेची सांगता केली.

रायगड जिल्हा परिषदेतर्फे ५० आशा स्वयंसेविकांचा सन्मान

आयुष्मान भारत कार्ड निर्मितीचे १०० टक्के उद्दिष्ट केले पूर्ण

अलिबाग, कोकणनामा वृत्त- रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने नुकताच २०२६-२७ मध्ये आयुष्मान भारत कार्ड निर्मितीचे १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या ५० आशा स्वयंसेविकांचा सन्मान राजिप उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती मधुकर पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन करण्यात आला. त्याचप्रमाणे विविध पुरस्कारप्राप्त आरोग्य केंद्रांचाही सन्मान करण्यात आला.

यावेळी उपाध्यक्ष मधुकर पाटील यांनी मार्गदर्शन करताना, “आरोग्य विभागाने सातत्याने सतर्क राहून काम करावे. त्याचप्रमाणे प्रत्येक नागरिकापर्यंत आरोग्यसेवेचा लाभ पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावा. जिल्ह्यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या डॉक्टरांचाही सन्मान केला जाईल,” असे सांगितले.

रायगड जिल्हा परिषद आरोग्य समितीची सभा नुकतीच उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती मधुकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेसाठी जि.प. सदस्य उषा ठोंबरे, सदस्य नेहा पारंगे, सदस्य शर्मिला बोडके, सदस्य ॲड. अविनाश ठाकूर, सदस्य दिशा जाधव, सदस्य मन्सूर ताज, खालापूर पंचायत समिती सभापती कृष्णा पारंगे, मुरुड पंचायत समिती सभापती निलेश घटवळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी, सहायक आरोग्य अधिकारी डॉ. जयेश गोसावी यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी, पुरस्कारप्राप्त आरोग्य केंद्रांचे प्रतिनिधी आणि आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या.

या सभेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी यांनी ‘तिशीचा पल्ला.. तपासणी अन् सल्ला’ या अभियानाची सविस्तर माहिती दिली. तसेच, ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ अभियानाबाबत आढावा घेण्यात आला. २०२६-२७ मध्ये आयुष्मान भारत कार्ड निर्मितीचे १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या ५० आशा स्वयंसेविकांचा सन्मान राजिप उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती मधुकर पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन करण्यात आला. यानंतर, रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात आपल्या सेवाकाळात अत्यंत निष्ठा व प्रामाणिकपणे काम केल्याबद्दल तीन

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचाही गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

पुरस्कारप्राप्त आरोग्य केंद्रांचाही गौरव:

राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकनामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र चिखलीने राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. याशिवाय, उपकेंद्र खंडाळे (प्रा.आ. केंद्र पोयनाड) राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल, उपकेंद्र धामणी (प्रा.आ. केंद्र नेरे) राज्य स्तरावर उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल आणि उपकेंद्र देवळी (प्रा.आ. केंद्र गोरेगाव) राज्य स्तरावर उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल गौरविण्यात आले.

विकास की विनाशाची वाट? महाडमधील औद्योगिक सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह

-उमाजी म. केळुसकर / वास्तव

महाराष्ट्राच्या औद्योगिक नकाशावर रायगड जिल्ह्याला एक महत्त्वपूर्ण स्थान आहे, विशेषतः महाड एमआयडीसीच्या औद्योगिक वसाहतीमधून वारंवार दुर्घटना घडणे ही एक गंभीर आणि सखोल चिंतेची बाब बनली आहे. नुकतीच महाड एमआयडीसीतील सिनर्जीया केम इंडस्ट्रीज कंपनीत घडलेली स्फोटाची भयंकर दुर्घटना पुन्हा एकदा संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा, कारखाना व्यवस्थापन आणि कामगार सुरक्षेच्या कठोर वास्तवावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून गेली आहे. उद्योग क्षेत्रातील वाढती बेपर्वाई आणि सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष करण्याची वृत्ती यामुळे सामान्य कामगारांच्या आयुष्याशी खेळखंडोबा सुरू असल्याचे वारंवार सिद्ध होत आहे. रविवारी रात्री घडलेल्या या भीषण टँक स्फोटात सात कामगार गंभीर जखमी झाले, तर एका कामगाराची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी टळली असली, तरी या घटनेने दिलेला इशारा अत्यंत गंभीर आहे, ज्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे भविष्यात आणखी मोठ्या मानवनिर्मित संकटांना आमंत्रण देण्यासारखे आहे. अशा दुर्घटनांमुळे संपूर्ण औद्योगिक पट्ट्यात एक भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण पसरत चालले आहे.

या घटनेची व्याप्ती केवळ एका कारखान्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. स्फोटाची तीव्रता इतकी प्रचंड होती कि, संबंधित कंपनीचे संपूर्ण स्ट्रक्चर जमीनदोस्त झाले आहे, तर परिसरातील इतर कारखान्यांनाही त्याचा जोरदार फटका बसला आहे. सर्वात भीतीदायक बाब म्हणजे, या स्फोटाचे हादरे कंपनीपासून तब्बल चार ते पाच किलोमीटर परिसरातील गावांमध्ये तीव्रतेने जाणवले. मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या भीषण आवाजामुळे आणि हादऱ्यांमुळे आजूबाजूच्या गावांमधील नागरिक प्रचंड दहशतीखाली आले. काही क्षणांसाठी संपूर्ण परिसरात भीतीचे आणि अनास्थेचे वातावरण निर्माण झाले होते. ग्रामीण भागातील निष्पाप नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रासायनिक कारखान्यांच्या नजीक राहणाऱ्या या नागरिकांच्या जिवाशी खेळण्याचा अधिकार कोणालाही नाही. प्रशासनाने जारी केलेल्या सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे आणि नियमांचे उल्लंघन होत असल्याशिवाय अशा तीव्रतेचे स्फोट घडत नाहीत, हे वारंवार सिद्ध झाले आहे.

या प्रकरणी महाड एमआयडीसी पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि घेतलेली कठोर भूमिका स्वागतार्ह आहे. पोलिसांनी केवळ घटनेची नोंद करून न थांबता, कंपनीच्या व्यवस्थापनासह उत्पादन व्यवस्थापक (प्रॉडक्शन मॅनेजर), सुपरवायझर, ऑपरेटर आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे कि, कंपनीत उत्पादन प्रक्रिया सुरू असताना कोणत्याही प्रकारची आवश्यक ती खबरदारी, दक्षता आणि सुरक्षा उपायांचे पालन करण्यात आले नव्हते. धोकादायक यंत्रणा आणि अत्यंत प्रज्वलनशील किंवा रासायनिक पदार्थ हाताळताना जे मानके पाळावे लागतात, त्यांची पूर्णपणे पायमल्ली करण्यात आली. सुरक्षेच्या प्राथमिक नियमांकडे पद्धतशीर दुर्लक्ष केल्यामुळेच ही दुर्घटना घडली, असा स्पष्ट आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. केवळ एका व्यक्तीवर नव्हे, तर प्रॉडक्शन मॅनेजरपासून ते थेट कंपनी व्यवस्थापनाशी संबंधित सर्व घटकांवर गुन्हे दाखल झाल्यामुळे उद्योगांमध्ये धाक निर्माण होणे गरजेचे आहे. परंतु, कायदेशीर कारवाईचा बडगा उगारल्यानंतरही अशा घटनांची पुनरावृत्ती रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजनांची गरज आहे.

महाड आणि लगतच्या परिसरातील रासायनिक कंपन्यांमध्ये सुरक्षा मानकांचा अभाव ही काही नवीन समस्या नाही. यापूर्वीही अशा अनेक दुर्घटना या भागात घडल्या आहेत, ज्यात अनेक कामगारांना आपले प्राण गमवावे लागले आहेत किंवा ते कायमचे अपंग झाले आहेत. असे असूनही कंपन्यांचे मालक आणि व्यवस्थापन सुरक्षेच्या मुद्द्यावर नेहमीच डोळेझाक करताना दिसतात. कामगारांच्या जीवापेक्षा नफा कमावण्याच्या लालसेपोटी सुरक्षा उपकरणांवर खर्च न करणे, कालबाह्य झालेली यंत्रसामग्री बदलण्यास टाळाटाळ करणे आणि कामगारांना योग्य ते सुरक्षा प्रशिक्षण न देण्याची प्रवृत्ती कारखानदारांमध्ये बळावली आहे. जेव्हा एखादी मोठी दुर्घटना घडते, तेव्हा काही दिवस तपास, धाडसत्र, निलंबन आणि भरपाईच्या घोषणांचे राजकारण होते, आणि काही कालावधीनंतर परिस्थिती पुन्हा पूर्ववत होते. ही साखळी आता थांबली पाहिजे. कामगारांच्या घामावर आणि रक्तावर उभे राहिलेले हे उद्योग जर त्यांच्या सुरक्षेची कोणतीही हमी देऊ शकत नसतील, तर अशा उद्योगांवर नियंत्रण ठेवणाऱ्या यंत्रणा काय करत आहेत, हा अत्यंत कळीचा सवाल आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB), औद्योगिक सुरक्षा आणि आराको निदेशालय (Directorate of Industrial Safety and Health – DISH) आणि स्थानिक प्रशासन यांच्यावर या सर्व प्रकारांची कठोर पाहणी करण्याची मोठी जबाबदारी आहे. परंतु, दुर्दैवाने अनेकदा कागदोपत्री सर्वकाही नियमानुसार सुरू असल्याचे दाखवले जाते आणि प्रत्यक्षात जमिनीवर मात्र सुरक्षेच्या सर्व चिंध्या उडालेल्या असतात. सिनर्जीया केम कंपनीत घडलेली ही घटना यंत्रणांच्या कारभारावर मोठा प्रकाश टाकते. जर वेळोवेळी योग्य ती तपासणी आणि ऑडिट केले गेले असते, तर कदाचित हा स्फोट टळला असता. आता गरज आहे ती केवळ गुन्हे दाखल करण्याची नाही, तर दोषींना कठोर शिक्षा मिळवून देण्याची आणि महाड एमआयडीसीतील प्रत्येक कारखान्याचे कसून सुरक्षा ऑडिट करण्याची. ज्या कंपन्या सुरक्षा नियमांचे पालन करत नाहीत, त्यांच्यावर तत्काळ टाळेबंदीची कारवाई करणे गरजेचे आहे.

या दुर्घटनेत जखमी झालेल्या कामगारांच्या वैद्यकीय उपचाराचा संपूर्ण खर्च संबंधित कंपनी व्यवस्थापनाने उचलला पाहिजे, तसेच त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना योग्य ती आर्थिक भरपाई मिळवून देणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे. परंतु, आर्थिक भरपाई म्हणजे मानवी जीवनाची किंमत होऊ शकत नाही. जखमी झालेल्या सर्वसामान्य कामगार बांधव आपल्या कुटुंबाच्या पोटार्थीसाठी प्रामाणिकपणे मेहनत करत असतात. त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी केवळ त्यांची स्वतःची नसून ती कंपनी व्यवस्थापन आणि राज्याच्या औद्योगिक धोरणाची आहे. आज सिनर्जीया केम कंपनीतील स्फोटानंतर संपूर्ण महाड परिसरात एक अनामिक भीतीचे वातावरण आहे. या भीतीचे रूपांतर विश्वासात बदलायचे असेल, तर प्रशासनाला अत्यंत कठोर पावले उचलत पांढरपेशा व्यवस्थापनाला धडा शिकवावा लागेल.

औद्योगिक विकास आणि प्रगती ही देशाच्या व राज्याच्या अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे, यात शंका नाही. लाखो लोकांना रोजगार देणाऱ्या एमआयडीसीचे महत्त्व आपण नाकारू शकत नाही. परंतु, ही प्रगती मानवी रक्ताच्या किंमतीवर किंवा निष्पाप कामगारांच्या जीवावर होऊ शकत नाही. मानवी सुरक्षितता ही विकासाच्या कोणत्याही निकषापेक्षा सर्वोच्च असली पाहिजे. महाड एमआयडीसीतील या दुर्घटनेने प्रशासनाला आणि उद्योग जगताला पुन्हा एकदा आत्मपरीक्षण करण्याची संधी दिली आहे. आता केवळ कागदी घोडे नाचवून चालणार नाही, तर दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करून भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती कधीही होणार नाही, अशी कठोर चौकट निर्माण करावी लागेल. तरच महाडमधील या कामगारांना आणि भयभीत झालेल्या नागरिकांना खरा न्याय मिळेल आणि खऱ्या अर्थाने सुरक्षित औद्योगिक विकासाचा मार्ग प्रशस्त होईल. हाच खरा बदल भविष्यातील औद्योगिक सुरक्षिततेचा पाया ठरवेल.

हायवेवरील कायदा अन् सुव्यवस्थेचा ढासळता बुरखा

-उमाजी म. केळुसकर / वास्तव

पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर खालापूर टोलनाका परिसरातील मांडप गावच्या हद्दीत पिस्तुलाचा धाक दाखवून कारचालकाला लुटल्याची घटना समोर आली आहे. २५ सप्टेंबर रोजी दुपारी २.२५ वाजण्याच्या सुमारास घडलेली ही घटना केवळ एका लुटमारीपुरती मर्यादित नसून, राज्याच्या सर्वात महत्त्वाच्या आणि व्यस्त समजल्या जाणाऱ्या द्रुतगती महामार्गावरील सुरक्षेच्या धिंडवडे उडवणारी आहे. एका अॅप्लिकेशनवरून पुणे ते बेलापूर सीबीडी असा प्रवास करण्यासाठी कार भाड्याने घेण्यात आली होती. खालापूर टोलनाका ओलांडल्यानंतर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या खांबावळच आरोपीने चालकाला कार रस्त्याच्या कडेला उभी करण्यास सांगून त्याच्या डोक्याला पिस्तूल लावले आणि खिशातील चार हजार रुपये हिसकावून पळ काढला. या संपूर्ण प्रकारामुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या सामान्य नागरिकांच्या अन् वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा अत्यंत गंभीर स्वरूपात ऐरणीवर आला आहे.

पुणे-मुंबई एक्सप्रेस वे हा महाराष्ट्रातील आर्थिक आणि दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा महामार्ग मानला जातो. दररोज हजारो गाड्या या रस्त्यावरून वेगाने धावतात. लाखो प्रवासी, व्यावसायिक, चाकरमानी आणि पर्यटक या मार्गाचा वापर करतात. अशा गजबजलेल्या आणि हाय-टेक समजल्या जाणाऱ्या महामार्गावर भरदुपारी २.२५ वाजता, तेही टोलनाक्यापासून अवघ्या काही अंतरावर आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या अगदी जवळ एका चालकाच्या डोक्याला पिस्तूल लावले जाते, ही बाब अत्यंत धक्कादायक आणि चीड आणणारी आहे. ज्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत, तिथे गुन्हेगारांना पोलिसांचा किंवा कायद्याचा कसलाही धाक उरलेला नाही, हेच या घटनेवरून स्पष्ट होते. गुन्हेगार इतके निर्धास्त आणि धीट कसे होतात, हा मुख्य प्रश्न आहे.

अलिकडच्या काळात ऑनलाईन कॅब बुकिंग आणि रेंटल कार सर्व्हिसेसचा वापर प्रचंड वाढला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू झालेल्या या अॅप्सचा वापर आता गुन्हेगार आपल्या काळ्या कृत्यांसाठी करू लागले आहेत. अॅपवर बनावट नावाने किंवा बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रोफाईल बनवून गाड्या बुक करायच्या आणि निर्जन स्थळी किंवा महामार्गावर चालकाला लुटायचे, असे प्रकार वाढत चालले आहेत. या प्रकरणातही आरोपीने अॅप्लिकेशनवरून कार भाड्याने घेतली आणि प्रवासादरम्यान चालकालाच सावज बनवले. यावरून हे स्पष्ट होते की, अशा डिजिटल सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांच्या केवायसी (KYC) आणि प्रवाशांच्या पडताळणी प्रक्रियेत मोठ्या त्रुटी आहेत. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला सहज गाडी भाड्याने मिळणे आणि त्याने गाडीत शस्त्रास्त्रांसह प्रवेश करणे, हे सुरक्षेच्या दृष्टीने मोठे आव्हान ठरत आहे. प्रवाशांची योग्य पडताळणी न करता सेवा पुरवणाऱ्या अशा अॅप आधारित कंपन्यांवरही कठोर कायदेशीर कारवाई करण्याची आणि त्यांच्यासाठी कडक नियमावली लागू करण्याची गरज निर्माण झाली आहे.

दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे महामार्गांवरील पोलिसांची गस्त आणि सुरक्षा व्यवस्था. एक्सप्रेस वेवर ठिकठिकाणी टोलनाके आहेत, जिथे प्रवाशांकडून मोठा कर वसूल केला जातो. टोलच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा महसूल गोळा केला जात असताना प्रवाशांना आणि वाहनचालकांना नेमकी कसली सुरक्षा दिली जाते, हा सवाल या निमित्ताने विचारला गेला पाहिजे. टोलनाक्यांवर केवळ पैसे वसूल करण्याचे काम वेगाने होते, परंतु तिथे सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही काटेकोर तपासणी किंवा संशयित हालचालींवर लक्ष ठेवण्याची यंत्रणा कार्यरत नसते. महामार्गावर पेट्रोलिंग करणाऱ्या पोलीस गाड्या केवळ अपघात झाल्यास किंवा वाहतूक कोंडी झाल्यावरच दिसतात का, असा प्रश्न पडतो. जर भरदुपारी दिवसाढवळ्या पिस्तुलासारखे प्राणघातक शस्त्र बाहेर काढून दरोडा टाकला जात असेल, तर रात्रीच्या वेळी प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या हाती आहे?

या घटनेतील आणखी एक गंभीर पैलू म्हणजे अवैध शस्त्रांचा शहरांमधील आणि महामार्गांवर सहज होणारा वावर. एका साध्या लुटमारीसाठी गुन्हेगाराकडे थेट पिस्तूल उपलब्ध असणे, हे राज्यांमधील अवैध शस्त्र पुरवठ्याचे जाळे किती खोलवर पसरले आहे याचे जिवंत उदाहरण आहे. पिस्तूल सहज मिळणे आणि ते घेऊन बिनधास्तपणे महामार्गावर फिरणे ही बाब गृहखात्याच्या आणि पोलीस प्रशासनाच्या गुप्तहेर यंत्रणेच्या अपयशावर बोट ठेवते. केवळ चार हजार रुपयांसाठी जर एखादा गुन्हेगार डोक्याला पिस्तूल लावू शकतो, तर चालकाने प्रतिकार केला असता तर काय घडले असते, या विचारानेच अंगावर काटा येतो. आज चार हजार रुपये लुटले गेले, उद्या कोणाचा जीव जाण्याची वाट पोलीस पाहणार आहेत का?

खालापूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत. परंतु, केवळ गुन्हा दाखल करून किंवा आरोपीला पकडून हा प्रश्न सुटणारा नाही. अशा घटनांमुळे एक्सप्रेस वेवरून प्रवास करणाऱ्या चालकांमध्ये आणि प्रवाशांमध्ये भीतीचे सावट पसरते. विशेषतः रात्रीच्या किंवा भरदुपारी एकट्याने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी हा मार्ग आता असुरक्षित वाटू लागला आहे. प्रवाशांचा आणि चालकांचा पोलीस यंत्रणेवरील विश्वास टिकवून ठेवणे हे प्रशासनापुढील मोठे आव्हान आहे.

या समस्येवर मात करण्यासाठी पोलीस प्रशासनाने आणि महामार्ग प्राधिकरणाने तातडीने काही कठोर पावले उचलणे अत्यंत आवश्यक आहे. प्रथम, एक्सप्रेस वेवरील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे केवळ नावापुरते नसून ते प्रत्यक्ष वेळेत (Real-time) मॉनिटर केले गेले पाहिजेत. कॅमेऱ्यांच्या परिसरात संशयित हालचाली दिसल्यास तात्काळ जवळच्या गस्ती पथकाला अलर्ट जाणारी यंत्रणा उभी केली पाहिजे. द्वितीय, महामार्गावरील पोलीस पेट्रोलिंगचे प्रमाण दुपारी आणि रात्रीच्या वेळी वाढवले पाहिजे. तृतीय, भाड्याने गाड्या पुरवणाऱ्या आणि कॅब सर्व्हिस देणाऱ्या कंपन्यांना प्रवाशांची बायोमेट्रिक किंवा आधार आधारित पडताळणी सक्तीची केली पाहिजे, जेणेकरून गुन्हेगारांची ओळख लपणार नाही.

महामार्गावरील प्रवास हा सुरक्षित आणि भयमुक्त असणे हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे. टोलच्या नावाखाली लाखो रुपये मोजणाऱ्या जनतेला जर रस्त्यावर पिस्तुलाच्या धाकाचा सामना करावा लागत असेल, तर ही बाब अत्यंत लाजीरवाणी आहे. खालापूर परिसरातील ही घटना पोलीस प्रशासनासाठी एक धोक्याची घंटा ठरली पाहिजे. या घटनेतील आरोपीला तातडीने बेड्या ठोकून त्याला कठोर शिक्षा झालीच पाहिजे, पण त्याचसोबत एक्सप्रेस वेवरील सुरक्षा व्यवस्था भेदून अशा घटना पुन्हा घडणार नाहीत, यासाठी कायमस्वरूपी आणि ठोस उपाययोजना करण्याची नितांत गरज आहे. अन्यथा, द्रुतगती महामार्ग हा विकासाचा मार्ग न राहता गुन्हेगारांचा अड्डा बनेल, यात शंका नाही.

रोह्याची तरुणी चार जिल्ह्यांची सीमा ओलांडून कशी ठरली क्रूरतेची शिकार?

-उमाजी म. केळुसकर / वास्तव

महाराष्ट्राच्या सुसंस्कृत आणि प्रगतशील राज्याचा चेहरा वेठीस धरणारी, मानवी संवेदना गोठवून टाकणारी आणि काळजाचा थरकाप उडवणारी एक अत्यंत भयानक घटना नुकतीच समोर आली आहे. रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातून सुरू झालेला एका असहाय आणि ३१ वर्षीय गर्भवती तरुण मुलीचा प्रवास, चार जिल्ह्यांच्या सीमा ओलांडत थेट धुळ्यापर्यंत कसा पोहोचला आणि तिला कशा पद्धतीने जिवंत जाळण्यात आले, या संतापजनक वास्तवाने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि खानदेश या चार मोठ्या प्रांतांच्या भौगोलिक सीमांमधून हा संपूर्ण गुन्हेगारी कट रचला गेला, जो बघून माणूसकी मेली आहे की काय, असा गंभीर प्रश्न निर्माण होतो.

ही संपूर्ण कहाणी पिंकी हनुमंत काटकर नावाच्या एका ३१ वर्षीय तरुणीची आहे, जी पोटाची खळगी भरण्यासाठी किंवा परिस्थितीच्या रेट्यामुळे कलाकेंद्राच्या काळ्या दलदलीत येऊन अडकली होती. मूळची रायगडच्या रोहा परिसरातील असलेली ही मुलगी जेव्हा अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथील एका कलाकेंद्रात काम करत होती, तेव्हा तिथल्या अंतर्गत वादाची आग भडकली. याच वादातून तिच्यावर भयंकर घातपाताचा कट रचण्यात आला. एका स्त्रीच्या शरीराला, तिच्या अस्तित्वाला आणि तिच्या पोटात असलेल्या गर्भाला कवडीमोलाची किंमत न देता तिला संपवण्याचे षडयंत्र रचले गेले. जामखेडहून तिचा हा प्रवास सुरू झाला तो थेट मराठवाड्याच्या दिशेने. धाराशिव जिल्ह्यातील कळंबमधील काही माणसे तिला घेऊन फरार झाली आणि तिला बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा परिसरामध्ये आणण्यात आले. तिथे तिला अत्यंत अमानुषपणे, बेदम मारहाण करण्यात आली. त्या गर्भवती महिलेवर झालेल्या अनन्वित अत्याचाराने ती जागीच बेशुद्ध पडली. आरोपींनी ती मेली आहे असे गृहीत धरले आणि तिचे नामोनिशाण मिटवण्यासाठी तिथून तब्बल पाऊणे तीनशे किलोमीटर अंतरावर असलेल्या धुळे जिल्ह्याची वाट धरली.

धुळे-सोलापूर महामार्गावरील गरताड बारी परिसरातील एका डोंगराळ आणि निर्जन भागात तिला मृत समजून अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळून टाकण्यात आले. एका जिवंत माणसाला, त्यातही एका गर्भवती महिलेला संपवताना त्या नराधमांच्या हाताची एक सेकंदही थरथर कापली नाही. हा घटनाक्रम फक्त एका हत्येचा प्रवास नसून आपल्या राज्यातील गुन्हेगारी मानसिकता किती विकृत आणि हिंसक झाली आहे, याचे जिवंत उदाहरण आहे. कोकणातील रोहा ते थेट खानदेशातील धुळे असा हा पाऊणे तीनशे किलोमीटरचा पल्ला म्हणजे कायद्याच्या आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडवणारा ठरला.

आज महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांत चालणारी ही कलाकेंद्रे आणि त्यामागचे गुन्हेगारी जगक म्हणजेच अंडरवर्ल्ड पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. कलाकेंद्रांमधील अनैतिक धंदे, पैशांची देवाणघेवाण, अंतर्गत वर्चस्व आणि महिलांचे होणारे शोषण यावर नियंत्रण ठेवणारी कोणतीही यंत्रणा सक्षम उरलेली नाही. जेव्हा एका हतबल महिलेचे राज्यभर अशा प्रकारे धिंडवडे निघतात, तेव्हा आपले समाजजीवन कोणत्या पातळीवर जाऊन ठेपले आहे याचा विचार करावा लागतो. गुन्हेगारांच्या मनात पोलिसांचा आणि कायद्याचा धाक पूर्णपणे नाहीसा झाला आहे, म्हणूनच ते एका महिलेला चार जिल्ह्यांतून बिनधास्त फिरवून मारहाण करू शकतात आणि जाळून खाक करू शकतात. या घटनेत धुळे पोलिसांनी ११ तासांचे सीसीटीव्ही फुटेज धुंडाळून आणि तांत्रिक तपासाची चक्र वेगाने फिरवून या क्रूर कृत्यातील चार नराधम आरोपींना अवघ्या तीन दिवसांत बेड्या ठोकल्या, ही एकमेव दिलासादायक गोष्ट ठरली आहे. पोलिसांच्या या कामगिरीमुळे या भीषण गुन्ह्याचा छडा लागला खरा, पण यामुळे निर्माण झालेला सामाजिक प्रश्न सुटत नाही.

गुन्हेगारांना पोलिसांची भीती वाटेनाशी झाली आहे आणि समाजाला माणसाच्या जिवाची किंमत उरलेली नाही, हे या प्रकरणावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. जर अशीच परिस्थिती राहिली, तर महाराष्ट्रातील स्त्री सुरक्षिततेचा प्रश्न केवळ कागदावरच उरेल. पिंकी काटकर सारख्या अनेक मुली अशाच प्रकारे व्यवस्था आणि समाजाच्या क्रूर चक्कीत भरडल्या जात राहतील. या प्रकरणातील सर्व दोषींना तात्काळ कठोर फाशीची शिक्षा मिळणे अत्यंत गरजेचे आहे, जेणेकरून भविष्यात कुणीही अशा अमानुष कृत्याची पुनरावृत्ती करण्याची हिंमत करणार नाही. प्रशासनाने आणि समाजाने आता एकत्र येऊन या कलाकेंद्रांमधील काळ्या बाजारावर आणि गुन्हेगारी प्रवृत्तीवर कठोर वचक निर्माण करण्याची वेळ आली आहे, अन्यथा माणूसकीचा हा अंत असाच सुरू राहील.

विक्रेत्यांना सुविधा, नागरिकांना दिलासा; अलिबागमध्ये भाजी मंडई-मासळी मार्केटच्या कामाला वेग

४० लाखांची भाजी मंडई, एक कोटींचे मासळी मार्केट; वीज व बांधकाम समिती सभापती प्रशांत नाईक, उपनगराध्यक्ष ॲड. मानसी म्हात्रे यांच्याकडून कामाची पाहणी

अलिबाग, कोकणनामा वृत्त- शहरातील भाजी व मासळी विक्रेत्यांसह नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अलिबाग नगर परिषदेच्या माध्यमातून भाजी मंडई आणि मासळी मार्केट उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. नियोजनबद्ध, स्वच्छ आणि सुविधायुक्त बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या या दोन्ही प्रकल्पांमुळे आगामी काळात विक्रेते तसेच नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

भाजी मंडईच्या उभारणीसाठी सुमारे ४० लाख रुपये, तर मासळी मार्केटसाठी सुमारे एक कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. दोन्ही इमारतींचे काम चांगल्या सुविधा आणि नागरिकांच्या सोयी लक्षात घेऊन करण्यात येत असून, बाजारपेठ अधिक व्यवस्थित करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे.

वीज व बांधकाम समितीचे सभापती प्रशांत नाईक आणि उपनगराध्यक्ष ॲड. मानसी म्हात्रे यांनी सुरू असलेल्या भाजी मंडई आणि मासळी मार्केटच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी कामाची सद्यस्थिती, बांधकामाची प्रगती तसेच विक्रेते आणि नागरिकांसाठी आवश्यक असलेल्या सुविधांबाबत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतली.

“विक्रेत्यांना चांगली आणि सुविधायुक्त जागा मिळावी, तसेच नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि व्यवस्थित बाजारपेठ उपलब्ध व्हावी, हा या प्रकल्पामागील मुख्य उद्देश आहे. काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण करून नागरिकांना त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यावर भर आहे,” असे प्रशांत नाईक यांनी यावेळी सांगितले.

भाजी आणि मासळी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र व नियोजनबद्ध जागा उपलब्ध झाल्याने बाजारपेठेतील व्यवस्थापन अधिक सुटसुटीत होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर नागरिकांना खरेदी करताना अधिक चांगले आणि सुरक्षित वातावरण मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे दोन्ही प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर अलिबागच्या बाजारव्यवस्थेला अधिक शिस्तबद्ध आणि आधुनिक स्वरूप मिळणार आहे.

या प्रसंगी नगरसेवक ॲड. ऋषिकेश माळी, अश्विनी ठोसर, नीलम हजारे, निवेदिता वाघमारे, योजना पाटील, जमाल सय्यद तसेच नगरपरिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
……

लाडक्या योजनांसाठी पैसे, दिव्यांगांच्या वेळेस खडखडाट का?

-उमाजी म. केळुसकर / वास्तव

कल्याणकारी राज्याची व्याख्या कागदावर जितकी उदात्त दिसते, तितकीच ती प्रत्यक्षात दिव्यांगांच्या बाबतीत निष्ठुर ठरताना दिसत आहे. सन २००२ मध्ये दिव्यांगांना मिळणारा अत्यंत तोकडा मासिक निर्वाह निधी रु. ६००/- इतका होता. आज २३ वर्षांचा प्रदीर्घ काळ उलटून गेल्यानंतर, महागाईचा भस्मासुर आकाशाकडे गेला असताना, या मासिक निर्वाह निधीत वाढ होऊन तो रु. २५००/- झाला आहे. म्हणजेच तब्बल २३ वर्षांत शासनाने दिव्यांगांच्या हातात अवघी १९०० रुपयांची भर घातली! वर्षाला साधे १०० रुपयेही वाढले नाहीत, हा कसला सामाजिक न्याय? आजच्या महागाईच्या काळात २५०० रुपयांत महिनाभर पोट भरणे, औषधोपचार करणे आणि सन्मानाने जगणे शक्य आहे का, असा सवाल राज्यकर्त्यांच्या सदसदविवेकबुद्धीला विचारण्याची वेळ आली आहे. जर २५०० रुपयावरून ६००० रुपयांपर्यंत पोहोचण्यासाठी शासनाला अशीच संथ गती ठेवायची असेल, तर यासाठी आणखी ४६ वर्षे लागणार काय?

आजच्या काळात दूध, धान्य, गॅस आणि अत्यावश्यक औषधांचे भाव गगनाला भिडले आहेत. सामान्य निरोगी माणसाला जगताना नाकी नऊ येत असताना, ज्यांना शारीरिक किंवा मानसिक मर्यादेमुळे स्वतःच्या पायावर उभे राहता येत नाही, अशा दिव्यांगांना २५०० रुपयांत जगण्याचा सल्ला देणे ही क्रूर थट्टा आहे. दिव्यांगांचे आयुष्य हे केवळ अन्नापुरते मर्यादित नसते; त्यांच्यासाठी व्हिलचेअर, कुबड्या, ऐकण्याची साधने, सातत्याने लागणारी महागडी औषधे आणि सहायकाचा खर्च हे दैनंदिन जगण्याचे भाग असतात. त्यातच आजमितीला वाढलेली महागाई, वैद्यकीय तपासण्यांचे अव्वाच्या सव्वा दर आणि महागडे फिजिओथेरपीचे उपचार यामुळे दिव्यांगांचे मासिक बजेट पार कोलमडून गेले आहे. वाढत्या खर्चाच्या या अक्राळविक्राळ परिस्थितीत ही तुटपुंजी मदत म्हणजे उंटाच्या तोंडात जिरे ठरत असून यामुळे दिव्यांगांचे जगणे दिवसेंदिवस अधिकच दुरापास्त होत चालले आहे. या मूलभूत गरजांकडे डोळेझाक करून सरकार कोणत्या तोंडाने ‘सर्वसमावेशक विकासाचा’ दावा करते?

शासनाच्या इतर लोकप्रिय आणि राजकीय हेतूने प्रेरित झालेल्या योजनांकडे नजर टाकल्यास हा अन्याय अधिक तीव्रतेने स्पष्ट होतो. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ असो, ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ असो किंवा विविध प्रकारच्या मोफत भेटवस्तू आणि मोफत प्रवासाच्या गाजावाजा करणाऱ्या आकर्षक घोषणा असोत; अशा राजकीय फायद्याच्या योजनांसाठी शासन क्षणाचाही विलंब न लावता तिजोरीचे दरवाजे उघडते. मतांचे गणिते जुळवण्यासाठी हजारो कोटी रुपयांची खैरात एका रात्रीत मंजूर केली जाते आणि राज्यभर मोठ्या जाहिराती लावून स्वतःची पाठ थोपटून घेतली जाते. परंतु, जेव्हा संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावणबाळ योजनेच्या माध्यमातून समाजातील खऱ्या अर्थाने असहाय्य आणि दिव्यांग घटकाला जगण्यासाठी किमान ६००० रुपयांचा मासिक निर्वाह निधी देण्याची मागणी पुढे येते, तेव्हा मात्र प्रशासकीय लालफितीचा अडसर दाखवला जातो. सरकारच्या तिजोरीत खडखडाट असल्याचे रडगाणे गायले जाते. हा दुटप्पीपणा दिव्यांगांच्या भावनेचा घोर अपमान करणारा आहे.

सत्ताधारी आणि विरोधक दोघेही दिव्यांगांच्या मुद्द्यावर केवल सहानुभूतीची मलमपट्टी करतात, परंतु ठोस आर्थिक तरतूद करण्याचे धाडस दाखवत नाहीत. २३ वर्षांत १९०० रुपयांची वाढ म्हणजे दिव्यांगांच्या हक्कांची केलेली थट्टाच आहे. दिव्यांग हा समाजाचा दया याचिकाकर्ता नसून तो या देशाचा समान नागरिक आहे. घटनेने त्याला सन्मानाने जगण्याचा मूलभूत अधिकार दिला आहे. जर महागाईचा दर दरवर्षी वाढतो, लोकप्रतिनिधींचे भत्ते आणि वेतने एका रात्रीत दुप्पट-तिप्पट होतात, मग दिव्यांगांच्या मासिक निर्वाह निधीला महागाई निर्देशांकाशी का जोडले जात नाही? ६००० रुपये महिना हा काही प्रचंड मोठा आकडा नाही, तर तो आजच्या काळात आत्मसन्मानाने जगण्याचा किमान निकष आहे.

शासनाने आता तरी आपल्या धोरणकर्त्यांच्या डोळ्यांवरील झापडे हटवली पाहिजेत. ४६ वर्षांची वाट पाहायला लावणारी ही संथ आणि संवेदनाहीन प्रशासकीय मानसिकता मोडून काढण्याची गरज आहे. दिव्यांगांचा मासिक निर्वाह निधी तात्काळ वाढवून तो किमान ६००० रुपये महिना करावा आणि तो महागाई निर्देशांकाशी जोडून दरवर्षी आपोआप वाढेल अशी कायमस्वरूपी यंत्रणा उभी करावी. दिव्यांगांना लाचारीचे जिणे जगण्यास भाग पाडणे हे कोणत्याही पुरोगामी राज्याला शोभणारे नाही. राज्यकर्त्यांनी लक्षात ठेवावे की, दिव्यांगांच्या संयमाचा अंत पाहणे महागात पडू शकते; त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न हा पूर्ण न्यायाचा प्रश्न आहे आणि तो तातडीने सुटलाच पाहिजे!

error: Content is protected !!