Friday, October 9, 2026
Home Blog Page 14

प्रसूतीच्या वेदनांत रुग्णवाहिका खड्ड्यात अडकली; बाळाचा मृत्यू

आग्रा, कोकणनामा वृत्त- प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्यानंतर रुग्णालयाकडे निघालेली रुग्णवाहिका रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यात अडकली. चिखलामुळे तब्बल दोन तास रुग्णवाहिका अडकून पडल्याने गर्भवती महिलेला वेळेत आरोग्य केंद्रात पोहोचवता आले नाही. उपचाराला झालेल्या विलंबामुळे नवजात बाळाचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे. उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यातील बह तहसील परिसरातील गढवार गावात ३ सप्टेंबर रोजी मध्यरात्री ही घटना घडली.

२५ वर्षीय निधी हिला रात्री सुमारे १ वाजता प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या. कुटुंबीयांनी आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधून रुग्णवाहिका बोलावली. रुग्णवाहिका आल्यानंतर निधीला गावापासून सुमारे नऊ किलोमीटर अंतरावरील सामुदायिक आरोग्य केंद्रात नेण्यात येत होते. मात्र, घरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर गावाला मुख्य महामार्गाशी जोडणाऱ्या रस्त्यावर रुग्णवाहिका मोठ्या खड्ड्यात अडकली.

पावसामुळे रस्त्यावर चिखल झाल्याने चालकाला वाहन बाहेर काढता आले नाही. अखेर गावकऱ्यांनी ट्रॅक्टरची व्यवस्था केली. ट्रॅक्टरच्या मदतीने रुग्णवाहिका बाहेर काढण्यासाठी जवळपास दोन तास लागले. त्यानंतर निधीला आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र, तिथे शस्त्रक्रिया दुसऱ्या दिवशी केली जाईल, असे सांगण्यात आल्याचा दावा कुटुंबीयांनी केला. त्यामुळे तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पहाटे सुमारे ५ वाजता प्रसूती झाली; मात्र, बाळ मृतावस्थेत जन्माला आल्याचा आरोप आहे.

उपचाराला झालेल्या विलंबामुळे बाळाचा श्वास थांबल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याचा दावा नातेवाईकांनी केला. मात्र, या दाव्याची स्वतंत्र वैद्यकीय पुष्टी अद्याप झालेली नाही.

दरम्यान, रस्त्याचा काही भाग महिनाभरापूर्वी पावसामुळे वाहून गेल्याची तक्रार प्रशासनाकडे करण्यात आली होती, असा दावा निधीचा चुलत भाऊ भानू प्रताप सिंह यांनी केला. या घटनेची दखल घेत उपविभागीय दंडाधिकारी विनोद कुमार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून स्पष्टीकरण मागवले आहे.

अलिबाग चे कदम कुटुंब ठरले विजेता

तारक मेहता का उल्टा चश्मा’च्या प्रसिद्ध गोकुळधाम सोसायटी सेटला देणार भेट

अलिबाग, कोकणनामा वृत्त-अलिबाग येथील मीरा समीर कदम आणि त्यांच्या कुटुंबाने ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’च्या 18व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित लाइव्ह क्विझमध्ये विजेतेपद मिळवले आहे.सोनी सब आणि नीला फिल्म प्रॉडक्शन्स यांच्या वतीने 1 ते 21 ऑगस्टदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या 18 दिवसांच्या क्विझमध्ये देशभरातील लाखो चाहत्यांनी सहभाग घेतला.टीएमकेओसी क्लब हाऊस अॅपवर आयोजित या लाइव्ह क्विझच्या माध्यमातून चाहत्यांना गोकुळधाम सोसायटी आणि शोमधील लोकप्रिय पात्रांबाबतचे आपले ज्ञान तपासण्याची संधी मिळाली. या उपक्रमाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून, विजेत्यांची घोषणा टप्प्याटप्प्याने केली जात आहे.विजेत्या कुटुंबांमध्ये अलिबागच्या मीरा कदम आणि त्यांच्या कुटुंबाचा समावेश झाला आहे. त्यांना मुंबईतील ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’च्या प्रसिद्ध गोकुळधाम सोसायटी सेटला भेट देण्याची,शूटिंगचा अनुभव जवळून घेण्याची तसेच शोच्या कलाकारांसोबत 18 वर्षांचा वर्धापनदिन साजरा करण्याची विशेष संधी मिळणार आहे.शोचे निर्माता आणि क्रिएटर असित कुमार मोदी यांनी क्विझला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल आनंद व्यक्त केला असून, मूळ नियोजनापेक्षा अधिक म्हणजे 18 पेक्षा जास्त कुटुंबांना गोकुळधाम सोसायटीला भेट देण्याची संधी देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. अलिबागच्या कदम कुटुंबाच्या या यशामुळे स्थानिक पातळीवरही या लोकप्रिय शोच्या वर्धापनदिन सोहळ्याची उत्सुकता वाढली आहे.अजय भालवणकर,चीफ कंटेंट ऑफिसर,सोनी सब यांनी याविषयी बोलतांना आपले मत व्यक्त केले.

आदर्श पतसंस्थेची पाली-सुधागड शाखा सुरू

अलिबाग, कोकणनामा वृत्त- अलिबाग येथील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेची पाली-सुधागड  येथील शाखा सुरू करण्यात आली आहे. आदर्श पतसंस्थेची ही २३ वी शाखा आहे. आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या पाली-सुधागड शाखेचे उद्घाटन मंगळवारी ( दि. ८ )  ग.बा. वडेर हायस्कूलचे उपाध्यक्ष रवींद्र लिमये,  रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्हाईस चेअरमन  सुरेश खैरे व संस्थेचे संस्थापक सुरेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक सुरेश पाटील, पाली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पराग विजय मेहता, रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्हाईस चेअरमन सुरेश खैरे,  ग.बा. वडेर हायस्कूलचे उपाध्यक्ष रवींद्र लिमये, पाली व्यापारी पतसंस्थेचे अध्यक्ष अशोक मेहता, जनकल्याण पतसंस्था पालीचे अध्यक्ष चंद्रकांत (दादा) घोसाळकर, अष्टविनायक पतसंस्था नागोठणेचे अध्यक्ष विलास चौलकर, आलाप अशोक मेहता, पाली व्यापारी असोसिएशन अध्यक्ष, प्रतिष्ठित व्यापारी  इंदरशेठ परमार, जागा मालक अशोकशेठ  ओसवाल, प्रतिष्ठित व्यापारी दीपकशेठ ओसवाल,  प्रवीणशेठ  कोठारी, राजेंद्र (भाऊ) गांधी, पालीमधील उद्योजकसूरज शेळके, आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अभिजीत पाटील, संचालक विलाप सरतांडेल, संचालक भगवान वेटकोळी, संचालक संजय राऊत,  आदर्श पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनाक्षी पाटील हे यावेळी उपस्थित होते.

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन सुरेश खैरे, जनकल्याण पतसंस्थेचे अध्यक्ष चंद्र्कांत घोसाळकर, ग.बा. वडेर हायस्कूलचे उपाध्यक्ष रवींद्र लिमये, पाली व्यापारी पतसंस्थेचे अध्यक्ष अशोक मेहता यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी एकंदर संस्थेची वाटचाल, तसेच पाली येथे संस्थेची शाखा काढण्यामागची कारणे याबाबत आपले विचार व्यक्त केले व संपूर्ण पाली-सुधागडच्या नागरिकांना आदर्श पतसंस्थेच्या पाली शाखेला सहकार्य करण्याचे आवाहन केले.

पश्चिम-पूर्व समर्पित मालवाहतूक मार्गिका राष्ट्राला समर्पित; जेएनपीटी येथून पहिली डबल-स्टॅक कंटेनर मालगाडी मार्गस्थ

उरण, कोकणनामा वृत्त- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उरण येथील जेएनपीए (JNPT) येथे पश्चिम समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिकेच्या ३२६ किमी लांबीच्या आणि २० हजार ७०० कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या तीन महत्त्वपूर्ण टप्प्यांचे राष्ट्रार्पण करण्यात आले. यावेळी व्ही.सी.द्वारे जेएनपीटी बंदरातून पहिल्या डबल-स्टॅक कंटेनर मालगाडीला हिरवा झेंडा दाखवून राष्ट्राला समर्पित करण्यात आले. या कार्यक्रमाला राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, पालकमंत्री भरतशेठ गोगावले आणि महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, पूर्व आणि पश्चिम समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिका पूर्ण झाल्यामुळे देशाच्या लॉजिस्टीक व्यवस्थेला नवी गती व दिशा मिळाली आहे. एका मालगाडीतून मुंबईहून २५० पेक्षा अधिक ट्रकइतका माल वेगाने वाहून नेता येणार असून त्यामुळे वेळ आणि खर्चात मोठी बचत होईल. प्रवासी आणि मालवाहतूक रेल्वे स्वतंत्र झाल्यामुळे दररोज ४३० पेक्षा जास्त मालगाड्या धावू शकतील. यामुळे ट्रकने लागणारा ३० तासांचा प्रवास आता १० ते १२ तासांत पूर्ण होईल. याचा मोठा फायदा शेतकरी, व्यापारी आणि उद्योग क्षेत्राला होणार असून इंधनाची बचत व पर्यावरणाचे रक्षण होण्यास मदत होईल. तसेच, पायाभूत सुविधांवरील खर्चामुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी हे नेटवर्क पूर्ण होणे ही देशाच्या वाहतूक क्षेत्रातील ऐतिहासिक उपलब्धी असल्याचे सांगत महाराष्ट्रातील या प्रकल्पासाठी १० हजार कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक झाली असल्याचे स्पष्ट केले. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मार्गिका महाराष्ट्राच्या लॉजिस्टिक्स क्षमतेला मोठी चालना देणारी असल्याचे सांगत २०३० पर्यंत जेएनपीटी हे देशातील दशलक्ष टीईयू (TEU) पेक्षा अधिक क्षमता असलेले पहिले बंदर ठरेल असा विश्वास व्यक्त केला. या प्रकल्पाच्या उभारणीत डीएफसीसीआयएलचे (DFCCIL) व्यवस्थापकीय संचालक प्रवीण कुमार आणि जपानच्या महावाणिज्यदूत सातो हितोमी यांनीही भारत-जपान सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले.

चौल-रेवदंडा परिसरातील सुपारीच्या बागा धोक्यात, बागायतदार आर्थिक संकटात

चौल-रेवदंडा : कोकणनामा वृत्त- कोकणातील चौल-रेवदंडा परिसरातील हिरव्यागार सुपारीच्या बागांवर यंदा संकटाचे काळे ढग दाटले आहेत. कोळेरोगाचा वाढता प्रादुर्भाव, लांबलेला पावसाळा आणि हवामानातील अचानक झालेल्या बदलांमुळे सुपारीच्या पिकाला दुहेरी-तिहेरी फटका बसला आहे. झाडांवरील कच्ची सुपारी मोठ्या प्रमाणावर गळून पडत असल्याने वर्षातून एकदाच मिळणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून असलेल्या स्थानिक बागायतदारांचे लाखो रुपयांचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे.

या परिसरात सध्या अनेक बागांमध्ये सुपारीची तीव्र गळती सुरू असल्याचे चित्र आहे. त्यामुळे यंदा अपेक्षित उत्पादन मिळणार की नाही, या चिंतेने बागायतदारांची झोप उडवली आहे. ही गळती अशीच सुरू राहिल्यास संपूर्ण वर्षभराच्या उत्पन्नावर पाणी फेरावे लागेल, अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. सुपारी हे वर्षातून एकदाच हाती येणारे प्रमुख नगदी पीक असल्याने या पिकाचे नुकसान म्हणजे बागायतदारांच्या आर्थिक नियोजनाचा पूर्णपणे बोजवारा उडणे होय. उत्पादन घटल्यास केवळ बागायतदारच नव्हे, तर या पिकावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या अवलंबून असलेली स्थानिक अर्थव्यवस्थाही अडचणीत येण्याची शक्यता आहे.

या गंभीर पार्श्वभूमीवर कृषी विभागाने तातडीने चौल-रेवदंडा परिसरातील सुपारी बागांची प्रत्यक्ष पाहणी करावी आणि नुकसानग्रस्त बागांचे त्वरित पंचनामे करावेत, अशी जोरदार मागणी जोर धरू लागली आहे. नुकसानीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करून बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून योग्य ती आर्थिक भरपाई मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. केवळ रोगनियंत्रणाच्या उपाययोजना सांगून हा प्रश्न सुटणारा नसून, प्रत्यक्ष नुकसान झालेल्या बागायतदारांना तातडीने आर्थिक आधार देण्याची गरज आहे.

यासोबतच कृषी विभागाने तज्ज्ञांच्या माध्यमातून बागांची पाहणी करून कोळेरोगावर प्रभावी उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करावे, तसेच आवश्यक औषधोपचार आणि फवारणीबाबत तातडीने माहिती द्यावी, अशी मागणीही बागायतदारांकडून केली जात आहे. सुपारीची गळती रोखणे, नुकसानीचे पंचनामे करणे आणि बागायतदारांना शासकीय मदत मिळवून देणे या मागण्या आता अधिक तीव्र होत आहेत. कोकणातील बागायतदारांच्या उदरनिर्वाहाचा मुख्य आधार असलेल्या सुपारी पिकावरील या संकटाची दखल शासन किती गांभीर्याने घेते आणि नुकसानग्रस्तांना प्रत्यक्ष मदतीचा हात कधी मिळतो, याकडे आता संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!