Friday, October 9, 2026
Home Blog Page 12

भक्ती आणि प्रबोधनाचा खरा गणेशोत्सव

-उमाजी म. केळुसकर / वास्तव

भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या पावन मुहूर्तावर घरोघरी आणि सार्वजनिक मंडपांत श्री गणेशाचे आगमन झाले आहे. गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने, टाळ-मृदुंगाच्या गजर आणि धूप-दीप, आरतीच्या दरवळाने आसमंत उजळून निघाला आहे. महाराष्ट्रात गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून तो लोकजीवनाचा आत्मा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून धार्मिक परंपरेचा भाग असलेला हा उत्सव लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक स्वरूपात आणला. त्यामागचा हेतू अत्यंत उदात्त होता. पारतंत्र्याच्या काळात बहुजन समाजाला एकत्र आणणे, राष्ट्रनिर्मितीचे विचार रुजवणे, कला-संस्कृतीचे जतन करणे आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद निर्माण करणे, हा सार्वजनिक गणेशोत्सवाचा मुख्य गाभा होता. दुर्दैवाने, काळाच्या ओघात लोकमान्यांच्या या स्वप्नातील उत्सवाचे रूप पार बदलून गेले आहे. आजचा गणेशोत्सव आणि मूळ संकल्पना यांचा दूरवरही संबंध उरलेला नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक जीवनात गणेशोत्सवाला अत्यंत अनन्यसाधारण महत्त्व आहे. भाद्रपद शुद्ध चतुथला श्रीगणेशाची घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये होणारी प्रतिष्ठापना ही केवळ एका सणाची सुरुवात नसते, तर तो संपूर्ण समाजाचा एक महाउत्सव असतो. घरगुती गणेशोत्सवातील भक्तिभाव, आपुलकी आणि कौटुंबिक जिव्हाळा जसा मनाला स्पर्शून जातो, तसाच सार्वजनिक गणेशोत्सवातील उत्साह, एकता आणि कलागुणांना मिळणारे व्यासपीठ संपूर्ण वातावरण चैतन्यमय करून टाकते. श्रीगणेश हा केवळ विघ्नहर्ता नाही, तर तो 64 कला आणि 14 विद्यांचा अधिपती, म्हणजेच ‌‘बुद्धिदाता‌’ आहे. अशा या ज्ञान आणि बुद्धीच्या देवतेचा उत्सव साजरा करताना त्यातील धार्मिक पावित्र्य, सांस्कृतिक वारसा आणि सामाजिक भान टिकवून ठेवणे हे प्रत्येक नागरिकाचे आद्य कर्तव्य आहे.

गणेशोत्सवाचा इतिहास पाहिला, तर लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात एका विशिष्ट ध्येयाने केली होती. परकीय इंग्रजी राजवटीविरुद्ध जनतेला संघटित करणे, लोकांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना रुजवणे आणि समाजातील सर्व घटकांना एकत्र आणणे हा त्यामागील मुख्य उद्देश होता. स्वातंत्र्योत्तर काळातही सार्वजनिक गणेशोत्सवाने अनेक समाजोपयोगी कार्ये केली आहेत. आजही गणेशोत्सवाची ही सकारात्मक आणि उज्ज्वल बाजू आपण नाकारू शकत नाही. अनेक गणेशोत्सव मंडळे या दहा दिवसांत रक्तादान शिबिरे, मोफत आरोग्य तपासणी, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, पर्यावरण संवर्धनाचे उपक्रम आणि सामाजिक प्रबोधनावरील देखावे सादर करतात. महाराष्ट्राची पारंपरिक लोककला, जसे की झांजपथक, ढोल-ताशा पथके, लेझिम आणि भजन-कीर्तन यांसारख्या कलांना गणेशोत्सवामुळेच मोठे पुनरुज्जीवन मिळाले आहे. तरुण पिढी या पथकांच्या माध्यमातून शिस्त, श्रमदान आणि संस्कृतीशी जोडली जाते, ही अत्यंत कौतुकास्पद आणि सकारात्मक बाब आहे.

परंतु, दुसऱ्या बाजूला गेल्या काही दशकांत या उत्सवाचे स्वरूप ज्या वेगाने बदलत गेले आहे, ते अत्यंत चिंताजनक आहे. भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक प्रबोधनाची जागा आता प्रचंड भपका, व्यावसायिकता आणि शक्तिप्रदर्शनाने घेतली आहे. विशेषतः विसर्जन मिरवणुकांमध्ये पसरलेली विकृती ही बुद्धीच्या देवतेचा आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अवमान करणारी ठरत आहे. उत्सवातील भक्ती आणि पावित्र्य बाजूला राहून तिथे डीजेचा कर्णकर्कश आवाज, डोळ्यांना त्रासदायक ठरणारे घातक लेझर किरणे आणि अश्लील किंवा उत्तान गाण्यांवर होणारा नाच यांचा शिरकाव झाला आहे. ज्या देवतेला आपण ज्ञानाची आणि संयमाची मूर्त मानतो, त्या देवतेच्या उत्सवात असा गोंधळ आणि अश्लीलता कशी काय खपवून घेतली जाऊ शकते? बुद्धिदात्या गणेशाला हे चित्र नक्कीच क्लेशदायक वाटत असणार, यात शंका नाही.

डीजेच्या प्रचंड आवाजामुळे होणारे ध्वनीप्रदूषण केवळ कानांना त्रास देत नाही, तर ते लहान मुले, वृद्ध, आजारी व्यक्ती आणि प्राण्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरत आहे. अनेक ठिकाणी विसर्जन मिरवणुकीतील अतिआवाजामुळे हृदयविकाराचा झटका येऊन नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या दुर्घटना घडल्या आहेत. लेझरच्या तीव्र किरणांमुळे अनेक तरुण आणि लहान मुलांच्या डोळ्यांना कायमची हानी पोहोचल्याच्या बातम्या दरवर्षी समोर येतात. आनंदाच्या नावाखाली दुसऱ्यांच्या जीवाला आणि आरोग्याला धोक्यात आणणे, हा कोणता उत्सव आणि कोणता धर्म? विसर्जन मिरवणुकांमध्ये ज्या प्रकारे चित्रपटसृष्टीतील अश्लील गाणी, मद्यधुंद अवस्थेतील धिंगाणा आणि अभिरुचीहीन वर्तन पाहायला मिळते, ते पाहून गणेशोत्सवाचा मूळ उद्देशच हरवला आहे की काय, असा प्रश्न पडतो.

या नकारात्मक आणि विकृत बाबींवर वेळीच अंकुश ठेवला नाही, तर गणेशोत्सवाचे मूळ स्वरूप आणि गांभीर्य पूर्णपणे नष्ट होईल. उत्सव साजरा करण्यावर कोणाचाही आक्षेप नाही; उलटपक्षी उत्साह आणि आनंद असायलाच हवा. मात्र, त्या उत्साहाला जेव्हा विवेकाची जोड नसते, तेव्हा तो आनंद न राहता उपद्रव बनतो. गणेशोत्सवातील पावित्र्य आणि सामाजिक भान पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी समाज, गणेशोत्सव मंडळे आणि प्रशासन या तिघांनाही एकत्र येऊन गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.

प्रशासनाने ध्वनीप्रदूषण आणि लेझरच्या वापरावर कडक कायदेशीर कारवाई करणे आवश्यक आहे. केवळ कागदावर नियम न ठेवता, प्रत्यक्ष मिरवणुकीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. परंतु, केवळ कायद्याने किंवा पोलिसांच्या धाकाने हा बदल घडणे शक्य नाही. यासाठी गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी स्वयंशिस्त पाळणे सर्वाधिक महत्त्वाचे आहे. मंडळांनी एकत्र येऊन डीजे आणि लेझरला पूर्णपणे फाटा देण्याचा संकल्प केला पाहिजे. आपल्या पारंपरिक ढोल-ताशा, झांज आणि पारंपरिक वाद्यांचा गजर मिरवणुकीची शोभा वाढवण्यासाठी पुरेसा आहे.

त्याचप्रमाणे, विसर्जन मिरवणुकांमध्ये गायली जाणारी गाणी, वाजवली जाणारी संगीत रचना आणि केला जाणारा नाच हा सभ्य आणि उत्सवाच्या धार्मिकतेला साजेसा असावा. भक्तीगीते, पोवाडे, लोकगीते आणि देशभक्तीपर गाण्यांच्या माध्यमातूनही मिरवणुकीत अभूतपूर्व उत्साह निर्माण करता येतो. मंडळांनी देखाव्यांच्या माध्यमातून चालू सामाजिक विषयांवर, जसे की पर्यावरण रक्षण, व्यसनमुक्ती, महिला सुरक्षा आणि शिक्षण, यांवर प्रबोधन करण्यावर भर दिला पाहिजे.

घरगुती गणेशोत्सवात ज्याप्रमाणे एक शांतता, पावित्र्य आणि कौटुंबिक जिव्हाळा असतो, तसाच आदर आणि संयम सार्वजनिक उत्सवातही दिसला पाहिजे. समाज म्हणून आपण कुठल्या दिशेने जात आहोत, याचा पुनर्विचार करण्याची हीच ती वेळ आहे. उत्सव हा समाजाला जोडणारा, आनंद देणारा आणि विचारांची प्रगती करणारा असावा; समाजात त्रास, प्रदूषण आणि अश्लीलता पसरवणारा नसावा. या गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपण सर्वांनी मिळून बुद्धीच्या देवतेला अभिप्रेत असणारा, पावित्र्य जपणारा, पर्यावरणाचा रक्षण करणारा आणि सामाजिक भान ठेवणारा उत्सव साजरा करण्याचा निर्धार करूया. हेच श्रीगणेशाच्या चरणी खरे आणि खऱ्या अर्थाने समर्पक वंदन ठरेल.

गणेश तत्त्वज्ञानाची खरी दिशा

-उमाजी म. केळुसकर / वास्तव

भारतीय संस्कृतीत श्रीगणेशाचे स्थान अत्यंत अनन्यसाधारण आणि सर्वोच्च आहे. कोणत्याही मंगल कार्याचा प्रारंभ हा श्रीगणेशानेच केला जातो. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक सण नसून तो भारतीय समाजाच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि आध्यात्मिक चेतनेचा मुख्य केंद्रबिंदू राहिला आहे. आजच्या आधुनिक आणि धावपळीच्या युगात गणपती बाप्पाच्या रूपाकडे आणि त्याच्या तत्त्वज्ञानाकडे नव्या दृष्टीकोनातून पाहणे काळाची गरज बनले आहे.


लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची पायाभरणी करून समाजाला संघटित केले आणि स्वातंत्र्याची चेतना जागवली. आज जगभरात जिथे जिथे मराठी आणि भारतीय समुदाय वसला आहे, तिथे हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होतो. मात्र, या उत्सवाचे उथळीकरण होत असताना गणेशाच्या मूळ स्वरूपाचा आणि मूतशास्त्राचा विचार करणे अत्यंत आवश्यक ठरते. आजकाल व्यावसायिकता आणि मनोरंजनाच्या नावाखाली गणेशमूर्तींचे विडंबन किंवा अवाजवी प्रयोग होताना दिसतात. कार्टून पात्रांच्या रूपात किंवा अयोग्य आकारांत मूत बनवणे हे धर्मशास्त्र आणि मूतशास्त्र या दोन्हींच्या चौकटीत बसत नाही. देवाचे रूप हे केवळ कल्पनेचा खेळ नसून त्यामागे एक सखोल संकेत आणि प्रतीकशास्त्र दडलेले आहे. आपले विचार, श्रद्धा आणि परंपरा यांचा गाभा जपत देवतेचे पावित्र्य राखणे ही प्रत्येक नागरिकाची नैतिक जबाबदारी आहे. उत्सवातील वाढता गोंगाट आणि विकृती थांबवून मूलतत्त्वांची जपणूक करणे हीच खरी बाप्पाची पूजा ठरेल.


गणपती ही केवळ भारतापुरती मर्यादित असलेली देवता नाही, तर ती एक विश्वात्मक शक्ती आहे. जगाच्या पाठीवर विविध संस्कृतींमध्ये गणेश रूपाचे अवशेष आणि पुरावे आढळतात. मेक्सिकोतील प्राचीन माया संस्कृती असो किंवा मध्य व दक्षिण अमेरिकेतील प्राचीन अवशेष असो, तिथे गणेशमूर्तींसदृश्य शिल्पे सापडलेली आहेत. महाभारतासारखा महाग्रंथ लिहिणारा आद्य लेखक म्हणून श्रीगणेशाचा उल्लेख होतो. महष व्यासांनी रचलेले आणि गणपतीने लिहिलेले महाभारत हे मानवी बुद्धिमत्ता आणि संयमाचे अजोड उदाहरण आहे. यावरून गणपतीचे जागतिक आणि वैश्विक महत्त्व अधोरेखित होते. जगातील विविध भागांत आढळणारी ही प्रतीके भारतीय संस्कृतीच्या प्राचीन आणि व्यापक विस्ताराची साक्ष देतात, ज्यामुळे आपला इतिहास समृद्ध असल्याचे सिद्ध होते. ही जागतिक उपस्थिती आपल्या गौरवशाली परंपरेची साक्ष देते.


गणेशाच्या रूपातील प्रत्येक अवयव मानवी जीवनासाठी एक उत्कृष्ट मार्गदर्शक आणि जीवनपाठ आहे. गणपतीचे लंबोदर स्वरूप, विशाल कान, सूक्ष्म डोळे आणि वक्रतुंड ही रूपके उत्तम नेतृत्वाची आणि बुद्धिमत्तेची लक्षणे दाखवतात. शूर्पासारखे मोठे कान हे सांगता की, नेत्याने किंवा मानवाने आधी सर्वांचे ऐकून घेतले पाहिजे. समाजातील सुख-दुःख, निंदा-स्तुती पचवण्यासाठी गणपतीचे विशाल पोट (लंबोदर) प्रेरणा देते. सूक्ष्म डोळे दूरदृष्टीचे प्रतीक आहेत, तर हत्तीचे मस्तक हे विलक्षण स्मरणशक्ती आणि गांभीर्याचे निदर्शक आहे. गणपतीची शुंड ही विवेकबुद्धीचे प्रतीक आहे; ज्याप्रमाणे हत्तीची शुंड बारीक सुईही उचलू शकते आणि मोठे झाडही उखडून फेकू शकते, त्याचप्रमाणे माणसाकडे सूक्ष्म आणि स्थूल अशा दोन्ही गोष्टींचा विवेक असायला हवा. या सर्व गोष्टींचा रोजच्या आयुष्यात अंगीकार केल्यास माणूस आदर्श, संयमी आणि कणखर जीवन जगू शकतो. यामुळेच बाप्पाचे रूप केवळ पूजनीय नसून अनुकरणीय ठरते. या विचारांमुळे मानवी समाजात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित होण्यास मदत होते.


गणेशाच्या रिद्धी आणि सिद्धी या दोन शक्ती म्हणजे बुद्धी आणि कार्याची पूर्तता यांचा संगम आहे. जेव्हा योग्य बुद्धी आणि अथक परिश्रम एकत्र येतात, तेव्हाच कार्यात सिद्धी प्राप्त होते आणि त्याच्या फलश्रुतीतून लाभ आणि शुभ निर्माण होतात. यामागील रूपकात्मक संदेश हा आहे की, केवळ अंधश्रद्धेने किंवा पूजा-अर्चा करून यश मिळत नाही, तर त्याला योग्य बुद्धिमत्ता आणि प्रामाणिक प्रयत्नांची जोड असावी लागते. सत्कर्माची आणि परिश्रमांची जोड असेल तरच कोणतेही कार्य यशस्वी होते, हा धडा यातून आपल्याला मिळतो. यशाची हीच सूत्रे आपल्याला यशाच्या शिखरावर नेतात. बुद्धीचा योग्य वापर करूनच माणूस प्रगती साध्य करू शकतो.


भारतीय संस्कृतीची आणखी एक मोठी देणगी म्हणजे देवनागरी लिपी, जिला गणेश विद्या असेही म्हटले जाते. जगातील अनेक भाषांच्या लिपींमध्ये उच्चार आणि लेखन यात तफावत आढळते. इंग्रजीसारख्या भाषेत अनेक अक्षरे अनुच्चारित (सायलेंट) असतात किंवा एकाच अक्षराचे वेगवेगळे उच्चार होतात. याउलट देवनागरी ही अत्यंत शास्त्रीय आणि वैज्ञानिक लिपी आहे. जसे उच्चारले जाते तसेच लिहिले जाते. स्वरांची आणि व्यंजनांची योग्य वर्गवारी आणि रचना हे देवनागरी वैशिष्ट्य गणेशाच्या बुद्धिमत्तेचे आणि भारतीय ज्ञानाचे प्रतीक आहे. आपल्या भाषेचे आणि लिपीचे हे अभिमानस्पद सौंदर्य जपणे हे आपले परम कर्तव्य ठरते. या शास्त्रीय भाषेचा प्रसार होणे काळाची गरज आहे.


गणपतीला वाहिली जाणारी 21 दुर्वांची जुडी किंवा मोदकाचा नैवेद्य यामागेही आरोग्यशास्त्र आणि अध्यात्मशास्त्र दडलेले आहे. दुर्वा ही अत्यंत शीतल आणि दाहशामक वनस्पती आहे. आपल्या शरीरातील आणि मनातील विकार, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर यांसारख्या भावनांचे शमन करण्यासाठी आणि प्रपंचात समतोल साधण्यासाठी दुर्वा अर्पण केल्या जातात. पाच ज्ञानेंद्रिये, पाच कर्मेंद्रिये, पाच प्राण, पाच महाभूते आणि अंतःकरण अशा 21 तत्त्वांचा त्याग करून ईश्वराला शरण जाणे, हा दुर्वा अर्पण करण्यामागचा खरा आध्यात्मिक अर्थ आहे. हे आरोग्यदायी शास्त्र समजून घेतल्यास पूजाविधीमागील मूळ हेतू साध्य होतो आणि मन अंतर्मुख होऊन शांत होते. शरीराची आणि मनाची शुद्धी हाच खरा पूजाविधी आहे.


गणेशोत्सव साजरा करताना केवळ बाह्य डामडौल आणि गोंगाट यावर भर न देता गणेशाच्या रूपातील विचार आणि तत्त्वज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे. श्रीगणेश हा विघ्नहर्ता, बुद्धीदाता आणि मंगलमूत आहे. त्याच्या स्वरूपाचा योग्य अभ्यास करून, मूतशास्त्राचे पालन करत, पर्यावरणाचे भान राखून आणि देवनागरी व भारतीय संस्कृतीचा अभिमान बाळगून उत्सव साजरा करणे हेच खऱ्या अर्थाने गणेश रूप चिंतन ठरेल. गणेशाचे हे जीवनदर्शन आपल्या वैयक्तिक आणि सामाजिक जीवनाला अधिक समृद्ध, सुजाण आणि सन्माग बनवण्यासाठी सदैव मार्गदर्शक ठरत राहील. हाच समंजस विचार भावी पिढीपर्यंत पोहोचवणे आणि आपल्या समृद्ध वारशाचे संवर्धन करणे हेच आपले आद्य कर्तव्य ठरते. यातच आपल्या संस्कृतीचे खरे सौंदर्य सामावलेले आहे आणि समाजहितही याच मार्गावर अवलंबून आहे.

माधुरी हत्तीणीचे कोल्हापुरात जंगी स्वागत

कोल्हापूर, कोकणनामा वृत्त- महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील शिरोळ तालुक्यातील नांदणी मठातील प्रसिद्ध माधुरी हत्तीण तब्बल १३ महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर शनिवारी आपल्या मूळ घरी परतली. यावेळी हजारो भाविक आणि स्थानिक ग्रामस्थांनी तिचे ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांची आतषबाजी करत आणि फुलांची उधळण करून अत्यंत भावूक वातावरणात जल्लोषात स्वागत केले.

माधुरी गेल्या १३ महिन्यांपासून गुजरातमधील जामनगर येथील वनतारा पुनर्वसन केंद्रात होती. न्यायालयीन प्रक्रिया आणि उच्चस्तरीय समितीच्या आदेशानंतर तिला पुन्हा नांदणी मठात आणण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यानुसार वनताराची विशेष टीम आणि वनताराचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवान कार्णिक हे स्वतः माधुरीला घेऊन कोल्हापूरमध्ये दाखल झाले.

माधुरीचे आगमन होताच नंदणी आणि परिसरात आनंदाचे वातावरण पसरले होते. रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून ग्रामस्थांनी तिच्यावर गुलाबाच्या फुलांचा वर्षाव केला. मठाच्या परिसरात तिच्या स्वागतासाठी आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. तसेच, माधुरीच्या सुरक्षित वापसीसाठी सहकार्य केल्याबद्दल अनंत अंबानी यांचे आभार मानणारे होर्डिंग्जही नंदणी परिसरात ठिकठिकाणी लावले गेले होते.

चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग भारतात येऊनही आडमुठेपणा कायम

दिल्ली, कोकणनामा वृत्त- गलवान घाटीच्या वादानंतर चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग तब्बल सात वर्षानंतर भारत दाैऱ्यावर आले आहेत. सात वर्ष भारत आणि चीनमध्ये तणाव बघायला मिळाला. काही दिवसानंतर आता तणाव कमी झाला. भारतावर अमेरिकेने लावलेल्या टॅरिफवर चीनने भूमिका घेतली. अमेरिकेच्या विरोधात चीन मैदानात उतरला. ब्रिक्स परिषदेनिमित्त चीनचे अध्यक्ष भारतात आहेत. नरेंद्र मोदी आणि शी.जिनपिंग यांच्यात बैठक झाली. सीमा वाद मिटवण्यासाठी दोन्ही देशात सहमती झाली. मात्र, दोन्ही देशांकडून आलेले विधान विरोधाभास दर्शवत आहेत. चीनने आपल्या विधानात दोन्ही देशातील व्दिपक्षीय संबंध पुढे नेण्याची आणि सीमेच्या मुद्द्यावरून चर्चा करून तोडगा काढण्याबद्दल भाष्य केले. सीमावर्ती भागात शांती ठेऊन दोन्ही बाजूंनी मजबूत प्रगती यावर काम करत असल्याचे चीनने म्हटले. चीनचे थोडक्यात म्हणणे आहे की, सीमावाद मिटण्यापूर्वी संबंध सामान्य ठेवले पाहिजे.

पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी या गोष्टीवर भर दिला की, सीमेवर शांती, स्थिरता आणि व्दिपक्षीय संबंध मुद्द्यांचे पालन करणे आवश्यक आहे. भारताने म्हटले की, दोन्ही नेत्यांनी व्दिपक्षीय संबंध आणि दोन्ही देशांच्या नागरिकांचे हित लक्षात घेऊन निष्पक्ष, योग्य आणि दोन्ही देशांनी एकत्र येऊन वाद मिटवावा. भारताचे स्पष्ट मत आहे की, सीमा संबंधित करार आणि सहमतीचे पूर्णपणे पालन केले पाहिजे.

भारत आणि चीन सीमेवर तणाव आहे. काहींचे म्हणणे आहे की, चीन भारतीय क्षेत्रावर कब्जा करत आहे. आता दोन्ही देशांच्या विधानात फरक दिसत आहे. चीनचे म्हणणे आहे की, सीमा वाद सुरू असतानाही बाकी संबंध आपण व्यवस्थित ठेऊ शकतो. 2020 मधील गलवान झडपेनंतर भारताचे स्पष्ट आहे की, सीमेवर पूर्णपण शांती स्थापित होत नाही तोपर्यंत व्दिपक्षीय संबंध व्यवस्थित राहणार नाहीत.

भारताची स्पष्ट भूमिका आहे की, जोपर्यंत सीमेवर शांतता राहणार नाही, तोपर्यंत व्दिपक्षीय चर्चा शक्य नाही. मात्र, चीनचे म्हणणे आहे की, सीमेवरील तणाल मिटवत असताना व्दिपक्षीय चर्चा व्हायला पाहिजे. चीनने भारतात येऊनही चालबाजी केल्याचे दिसत आहे. आपलीच विधाने फिरवताना चीन दिसत आहे.

रूपेरी पडदा आणि बाप्पाचा उत्सव

-उमाजी म. केळुसकर / चित्रछाया

भारतीय समाज, संस्कृती आणि कला यांचा एकमेकांशी असलेला अनुबंध अत्यंत प्राचीन आणि गडद आहे. या त्रिगुणात्मक मिलाफाचे सर्वात देखणे, चैतन्यमयी आणि भव्य रूप पाहायला मिळते ते ‘गणेशोत्सव’ या महापर्वात. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची पायाभरणी करून समाजाला एका सूत्रात बांधले, तर पुढे चालून भारतीय चित्रपटांच्या रूपेरी पडद्याने या उत्सवाचा सांस्कृतिक आणि भावनिक कॅनव्हास अधिकच समृद्ध केला. ‘सिनेमातला आणि सिनेमाबाहेरचा गणपती’ हा केवळ चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील एक अध्याय नसून, तो मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीच्या जगण्याचा, तिच्या विश्वासाचा आणि असीम श्रद्धेचा जिवंत दस्तऐवज आहे. पडद्यावर साकारलेला गणपती रसिकांच्या मनात भक्तीचा आणि उत्साहाचा जल्लोष निर्माण करतो, तर कॅमेऱ्याच्या दिव्यांमागे, स्टुडिओच्या चार भिंतींत किंवा कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यात पूजला जाणारा गणपती चित्रपटसृष्टीला एक कौटुंबिक आणि भावनिक अधिष्ठान प्राप्त करून देतो. या दोन्ही रूपांचा प्रवास अत्यंत रंजक आणि सांस्कृतिकदृष्ट्या मौलिक असाच राहिलेला आहे.

मराठी चित्रपटसृष्टीचा विचार केला, तर गणेशोत्सवाचा आणि गणपती बाप्पाचा प्रभाव सुरुवातीच्या काळापासूनच दिसून येतो. ‘अन्नपूर्णा’ किंवा ‘शक्य ते सर्व’ अशा जुन्या चित्रपटांपासून सुरू झालेला हा प्रवास मराठी माणसाच्या दैनंदिन जीवनशैलीचे प्रतिबिंब पडद्यावर उमटवणारा होता. मराठी माणसाचे घर, त्याचा देव्हारा आणि त्याचा उत्सव गणपतीशिवाय पूर्ण होऊच शकत नाही; हीच संकल्पना मराठी चित्रपट निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी पडद्यावर जिवंत केली. जेव्हा आपण मराठीतील गणेशगीतांचा किंवा गणपतीवर आधारित चित्रपटांचा विचार करतो, तेव्हा ‘अष्टविनायक’ या चित्रपटाचा उल्लेख अपरिहार्य ठरतो. या चित्रपटाने केवळ अष्टविनायकाची महिमाच पडद्यावर आणली नाही, तर त्यातील गीते मराठी घराघरांत अमर केली. ‘प्रथम तुला वंदितो’, ‘तू सुखकर्ता तू दुःखहर्ता’ यांसारखी गाणी आज अनेक दशकांनंतरही तितक्याच ताजेपणाने आणि भक्तीभावाने ऐकली जातात. मराठी चित्रपटांनी गणपतीला केवळ कौटुंबिक उत्सवापुरते मर्यादित न ठेवता, त्याला एक सामाजिक आणि अध्यात्मिक परिमाण दिले.

पडद्यावरील उत्सवाचे चित्रण करताना कलाकारांचे आणि तंत्रज्ञांचे वैयक्तिक अनुभवही तितकेच रंजक आणि भावुक असतात. ‘फटाकडी’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान घडलेला किस्सा या संदर्भात अत्यंत बोलका आहे. चित्रपटातील एका गाण्याच्या चित्रीकरणासाठी भव्य सेट उभारण्यात आला होता आणि तिथे गणपतीची मूर्ती स्थापन करण्यात आली होती. चित्रपटाचे चित्रीकरण संपले तरीही त्या मूर्तीची प्रतिष्ठा आणि उत्सवाचे वातावरण इतके जिवंत झाले होते की, संपूर्ण युनिटने तो उत्सव अत्यंत भक्तीभावाने साजरा केला. अशा अनेक प्रसंगांतून हे सिद्ध होते की, चित्रपटसृष्टीसाठी गणपती हा केवळ संहितेचा (स्क्रिप्टचा) भाग नसून तो त्यांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू राहिला आहे.

दुसरीकडे, हिंदी चित्रपटसृष्टीने किंवा बॉलिवूडने गणेशोत्सवाचे भव्य आणि उत्कट रूप जगभरात पोहोचवण्याचे काम केले. मुंबईतील गणेशोत्सव आणि हिंदी चित्रपट यांचे नाते अत्यंत घट्ट आहे. हिंदी चित्रपटांमध्ये गणेश विसर्जनाचे, आगमनाचे किंवा आरतीचे दृश्य म्हणजे चित्रपटाला एक वेगळीच नाट्यमयता आणि ऊर्जा देणारे माध्यम ठरले. ‘अग्निपथ’, ‘वास्तव’, ‘डॉन’ यांसारख्या अनेक गाजलेल्या हिंदी चित्रपटांमध्ये गणपती उत्सवाचा वापर कथेतील महत्त्वाच्या मोडांवर अत्यंत प्रभावीपणे करण्यात आला. अमिताभ बच्चन यांच्यापासून ते नव्या पिढीतील कलाकारांपर्यंत सर्वांनीच पडद्यावर बाप्पाच्या आरतीचा आणि विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष तितक्याच उत्साहाने साकारला. मुंबईतील लालबागच्या राजाचे दर्शन असो किंवा गिरगाव चौपाटीवर होणारे विसर्जन, हिंदी चित्रपटांनी ही दृश्ये अतिशय भव्यतेने टिपली आणि जगाच्या कोपऱ्याकोपऱ्यात पोहोचवली.

कॅमेऱ्याच्या मागे असलेल्या ‘सिनेमाबाहेरच्या गणपती’ची गोष्ट तर याहूनही अधिक नयनरम्य आणि ऐतिहासिक आहे. मुंबईतील दिग्गज चित्रपट स्टुडिओंमध्ये साजरा होणारा गणेशोत्सव हा चित्रपटसृष्टीचा एक सुवर्णकाळ मानला जातो. यात सर्वात आघाडीवर नाव येते ते परळ येथील ऐतिहासिक ‘राजकमल कलामंदिर’चे. महाल्युमिनरी दिग्दर्शक व्ही. शांताराम यांनी ‘नवरंग’ चित्रपटाच्या वेळी उभारलेल्या भव्य सेटवरून प्रेरणा घेऊन राजकमल स्टुडिओमध्ये श्री गणेशाची स्थापना करण्याची परंपरा सुरू केली. हा उत्सव केवळ स्टुडिओपुरता मर्यादित नव्हता, तर चित्रपटसृष्टीतील सर्व घटकांना एकत्र आणणारे ते एक सांस्कृतिक केंद्र बनले होते.

तशाच प्रकारची, किंबहुना त्याहूनही अधिक चर्चा रंगायची ती चेंबूर येथील प्रसिद्ध ‘आर. के. स्टुडिओ’च्या गणेशोत्सवाची. शोमॅन राज कपूर यांनी सुरू केलेला आर. के. स्टुडिओचा गणपती हा मुंबईतील उत्सवाचा एक अविभाज्य भाग बनला होता. स्थापनेपासून ते अनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकीपर्यंत आर. के. स्टुडिओचा गणेशोत्सव हा अत्यंत दिमाखदार आणि कौटुंबिक वातावरणात पार पडायचा. राज कपूर यांच्यासह रणधीर कपूर, ऋषी कपूर, राजीव कपूर आणि पुढे चालून रणबीर कपूर अशी कपूर घराण्याची संपूर्ण पिढी या उत्सवात हिरिरीने सहभागी व्हायची. गिरगाव चौपाटीकडे जाणाऱ्या आर. के. स्टुडिओच्या विसर्जन मिरवणुकीत कपूर कुटुंबातील कलाकार स्वतः रस्त्यावर उतरून गुलाल उधळत, ढोल-ताशांच्या गजरत नाचायचे. हे दृश्य पाहण्यासाठी मुंबईकरांची अलोट गर्दी लोटायची. दुर्दैवाने, काळाच्या ओघात आर. के. स्टुडिओ बंद झाला आणि ती परंपरा खंडीत झाली; तरीही त्या आठवणी आजच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरल्या गेल्या आहेत.

चित्रपटसृष्टीतील कलाकारांचे गणपती बाप्पाशी असलेले नाते केवळ स्टुडिओपुरते किंवा सेटपुरते मर्यादित नाही. माधुरी दीक्षित, श्रद्धा कपूर, संजय दत्त, सलमान खान यांसारखे अनेक छोटे-मोठे कलाकार आपल्या घरी अत्यंत श्रद्धेने गणपतीची स्थापना करतात. परंपरेनुसार मोदक बनवणे, आरती करणे आणि संपूर्ण कुटुंबाने एकत्र येऊन उत्सव साजरा करणे, ही या कलाकारांची दुसरी बाजू प्रेक्षकांना पाहायला मिळते. पडद्यावर ग्लॅमरस दिसणारे हे कलाकार जेव्हा बाप्पाच्या चरणी नतमस्तक होतात, तेव्हा कला आणि भक्तीचा एक अनोखा संगम पाहायला मिळतो.

पूर्वीच्या काळात गणेशोत्सवाच्या काळात मराठी चित्रपट प्रदर्शित करण्याची एक खास पद्धत होती. पुणे आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची तुफान गर्दी व्हायची. सणाच्या या काळात नवा चित्रपट रिलीज होणे म्हणजे तो सुपरहिट होण्याचे समीकरण मानले जायचे. आजच्या डिजिटल आणि सॅटेलाइट युगात मनोरंजनाची माध्यमे बदलली असली, तरीही चित्रपट आणि गणेशोत्सवाचे हे नाते तिळमात्रही कमी झालेले नाही. आजही वृत्तवाहिन्या, एंटरटेनमेंट चॅनेल्स किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकारांच्या घरचा गणपती आणि स्टुडिओमधील गणेशोत्सव प्रेक्षकांपर्यंत पोहोचत असतो.

अशा प्रकारे, ‘सिनेमातला’ गणपती प्रेक्षकांना भक्ती, संगीत आणि मनोरंजनाची पर्वणी देतो, तर ‘सिनेमाबाहेरचा’ गणपती चित्रपटसृष्टीतील भेद विसरून सर्वांना एकाच धाग्यात बांधण्याचे काम करतो. पडद्यावरील कथा बदलल्या, तंत्रज्ञान बदलले आणि चित्रपट बनवण्याच्या पद्धती बदलल्या; तरीही बाप्पाविषयी असलेली निष्ठा आणि या उत्सवाचा उत्साह चित्रपटसृष्टीत आजही तितकाच कायम आहे. गणपती बाप्पा हा केवळ नवसाला पावणारा देव नसून, तो या कलासृष्टीचा मुख्य पाठीराखा, प्रेरणास्रोत आणि खऱ्या अर्थाने ‘विघ्नहर्ता’ आहे, हीच भावना या संपूर्ण प्रवासातून अधोरेखित होते.

फॅन्सी नंबर प्लेट्सची राजकीय दादागिरी

– उमाजी म. केळुसकर / वास्तव

कायदा सर्वांसाठी समान असतो, हे लोकशाहीतील मूळ तत्त्व आहे. परंतु, महाराष्ट्राच्या रस्त्यांवर धावणाऱ्या राजकीय नेत्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या अलिशान गाड्यांकडे पाहिले तर या तत्त्वाला रोज हरताळ फासला जात असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. नुकताच भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवरील फॅन्सी आणि बिगर-एचएसआरपी नंबर प्लेटचा विषय चांगलाच चर्चेत आला. सध्या अटकेत असलेले पुण्यातील युट्यूबर व माहिती अधिकार कार्यकर्ता संतोष पंडित यांनी ही बाब उघडकीस आणल्यानंतर आणि माध्यमांनी त्यावर प्रकाश टाकल्यानंतरही परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही. पण हा प्रश्न केवळ गोपीचंद पडळकर सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत एवढ्यापुरता मर्यादित नाही. वस्तुस्थिती अशी आहे की, पक्षाचा झेंडा कोणताही असो, सत्ताधारी असोत की विरोधी, पक्षाचे आमदार असोत, स्थानिक पदाधिकारी असोत वा केवळ एक सामान्य कार्यकर्ता राजकीय वरदहस्त असलेल्या बहुतांश लोकांच्या गाड्यांवर नियमांना फाटा देऊन लावलेल्या फॅन्सी नंबर प्लेट्सच पाहायला मिळतात.
केंद्रीय मोटार वाहन कायद्यानुसार रस्त्यावर धावणाऱ्या प्रत्येक वाहनाला प्रादेशिक परिवहन कार्यालयाने ठरवून दिलेल्या मानक आकार, रंग आणि फॉन्टमध्येच नंबर प्लेट लावणे बंधनकारक आहे. गाड्यांवर विशिष्ट सुरक्षा फीचर्स असलेल्या हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स बसवणे अनिवार्य करण्यात आले आहे. परंतु, आपल्या देशात आणि विशेषतः महाराष्ट्रात गाडीची नंबर प्लेट ही केवळ वाहनाची ओळख उरलेली नसून ती संबंधित व्यक्तीच्या राजकीय वजनाची, प्रभावाची आणि दादागिरीची व्हिजिटिंग कार्ड बनली आहे.
विरोधकांच्या, विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या आणि गल्लीबोळातील पदाधिकाऱ्यांच्या गाड्यांकडे लक्ष टाकले तर देवनागरी लिपीचा गैरवापर करून 4141 या क्रमांकातून दादा तयार करणे, 4912 मधून भाऊ बनवणे, 4040 मधून राव किंवा 1155 मधून साहेब बनवण्याचा फॅन्सी प्रकार सर्रास चालतो. त्याशिवाय नंबर प्लेटवर अध्यक्ष, उपाध्यक्ष, युवा मोर्चा, सम्राट, आमदार-खासदार समर्थक अशा शब्दांचा आणि विविध पक्षांच्या चिन्हांचा सर्रास वापर केला जातो. हे केवळ हौस म्हणून केले जात नसून, त्यामागे वाहतूक पोलिसांना एक अप्रत्यक्ष इशारा देणे हाच मुख्य उद्देश असतो. नंबर प्लेटवरील ते नाव किंवा दादा-भाऊंची ओळख पाहून वाहतूक पोलिसांनी आपल्याला अडवू नये, दंडात्मक कारवाई करू नये आणि आपली कायद्यापेक्षा वरचढ असलेली दहशत रस्त्यावर दिसावी, हीच मानसिकता यामागे असते.
येथे सर्वात मोठा आणि गंभीर सवाल निर्माण होतो तो वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाच्याभूमिकेवर. एखादा सामान्य नागरिक, नोकरदार, शेतकरी किंवा कामगार जर चुकून फॅन्सी नंबर प्लेट लावून रस्त्यावर आला, तर वाहतूक पोलीस त्याला अडवून तात्काळ 500 ते 2000 रुपयांपर्यंत दंडाची पावती फाडतात, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातात. नियम म्हणजे नियम अशी तत्त्वनिष्ठा सामान्य नागरिकांना दाखवताना प्रशासनाचे हात अजिबात थरथरत नाहीत. परंतु, जेव्हा एखादा सत्ताधारी किंवा विरोधी पक्षाचा कार्यकर्ता फॅन्सी नंबर प्लेट लावून, पोलिसांच्या समोरून सुसाट वेगाने निघून जातो, तेव्हा पोलीस प्रशासनाचे डोळे अचानक झाकले जातात. कायद्याचा हा दुटप्पीपणा सामान्य माणसाच्या मनात कमालीचा संताप निर्माण करत आहे.
प्रशासकीय अधिकारी आणि वाहतूक पोलीस राजकीय दबावापोटी किंवा स्वतःचे काम सुरळीत चालू ठेवण्यासाठी या नेत्यांच्या व कार्यकर्त्यांच्या गाड्यांवर कारवाई करण्याचे टाळतात. एखाद्या कार्यकर्त्याला अडवून दंड आकारण्याचा प्रयत्न केल्यास थेट पक्षाच्या वरिष्ठांचा किंवा स्थानिक लोकप्रतिनिधीचा फोन पोलिसांना येतो. अनेकदा पोलिसांची तडकाफडकी बदली केली जाते किंवा त्यांना त्रास दिला जातो. या भीतीपोटी पोलीस प्रशासन सत्ताधारी असोत वा विरोधी, कोणत्याही राजकीय कार्यकर्त्याच्या गाडीला हात लावायला धजत नाही. ही हतबलता प्रशासनाच्या आणि कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडवणारी आहे.
लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्षांचे कार्यकर्ते हे समाजाचे मार्गदर्शक आणि आदर्श मानले जातात. त्यांनी कायद्याचे तंतोतंत पालन करून समाजासमोर एक आदर्श वस्तुपाठ ठेवायला हवा. लोकप्रतिनिधींनी सभागृहात कायदे करायचे आणि रस्त्यावर आल्यावर स्वतःच ते कायदे पायदळी तुडवायचे, असा प्रकार सुरू असेल तर सामान्य जनतेने कायद्याचा आदर का करावा? जर आमदार, खासदार किंवा पक्षाचे पदाधिकारीच नंबर प्लेट वापरत नसतील, सीटबेल्ट लावत नसतील आणि फॅन्सी नंबर प्लेट्स लावून फिरत असतील, तर सामान्य नागरिकांकडून नियमांचे पालन करण्याची अपेक्षा ठेवण्याचा नैतिक अधिकार प्रशासनाला उरत नाही.
फॅन्सी नंबर प्लेट्सचा विषय केवळ वाहतूक नियमांच्या उल्लंघनापुरता किंवा दंडापुरता मर्यादित नसून तो सुरेशक्षा आणि गुन्हेगारी नियंत्रणाशीही थेट जोडलेला आहे. अनेकदा गुन्हेगारी कृत्यांमध्ये, अपघातांमध्ये किंवा बेकायदेशीर कामांमध्ये वापरल्या जाणाऱ्या वाहनांवर अशा फॅन्सी आणि अस्पष्ट नंबर प्लेट्स असतात. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये किंवा लांबून हे नंबर सहजासहजी ओळखता येत नाहीत. त्यामुळे गुन्हेगारांचा शोध घेणे कठीण होते. राजकीय सोयीसाठी सुरू असलेला हा प्रकार अप्रत्यक्षपणे गुन्हेगारी वृत्तीला आणि बेकायदेशीर वर्तनाला खतपाणी घालणारा ठरत आहे.
जर खरोखरच महाराष्ट्रात कायद्याचे राज्य चालवायचे असेल, तर गृह विभाग आणि परिवहन मंत्रालयाने राजकीय चष्मा बाजूला ठेवून कठोर पावले उचलण्याची गरज आहे. कायदा कोणाचाही असोसत्ताधारी आमदाराचा असो, विरोधी पक्षाच्या नेत्याचा असो वा त्यांच्या कार्यकर्त्यांचारस्त्यावर नियम मोडणाऱ्या प्रत्येक वाहनावर भेदभाव न करता समान कारवाई झाली पाहिजे. महामार्गांवर आणि शहरांमधील महत्त्वाच्या चौकांत विशेष मोहीम राबवून, राजकीय झेंडे आणि फॅन्सी नंबर प्लेट्स लावणाऱ्या सर्व गाड्यांवर कारवाई झाली पाहिजे.
राजकीय पक्षांच्या शीर्ष नेत्यांनीही आपल्या कार्यकर्त्यांना ताकीद देण्याची वेळ आता आली आहे. गाडीवर पक्षाचा झेंडा किंवा नेत्याचे नाव लिहून कायद्याचे उल्लंघन करणे ही कोणतीही प्रतिष्ठा नसून तो पक्षाचा आणि नेत्याचाच अपमान आहे, ही जाणीव कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली पाहिजे. जोपर्यंत राजकीय वरदहस्ताची ही दादागिरी रस्त्यावरून हटत नाही आणि वाहतूक पोलीस कोणत्याही दबावाशिवाय राजकीय नेत्यांच्या गाड्यांवर कारवाई करत नाहीत, तोपर्यंत कायदा सर्वांसाठी समान आहे हे विधान कागदावरच राहील. लोकशाहीत कायद्याचे राज्य टिकवायचे असेल तर दंडाचा बडगा आधी राजकीय गाड्यांवर आणि नंतर सामान्य जनतेवर उगारावा लागेल, हाच या संपूर्ण प्रकरणाचा मुख्य संदेश आहे.

शिधापत्रिकाधारकांना ई-केवायसी बंधनकारक

३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन; ई-केवायसी न केल्यास राशनचा लाभ बंद होण्याची शक्यता

अकोला, कोकणनामा वृत्त- राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत शिधापत्रिकेवर धान्याचा लाभ घेणाऱ्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ज्या लाभार्थ्यांची अद्याप ई-केवायसी झालेली नाही, त्यांनी ३० सप्टेंबरपर्यंत आपल्या गावातील रास्त भाव दुकानात जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन पुरवठा विभागाने केले आहे.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमांतर्गत पात्र अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना दरमहा रास्त भाव दुकानांमार्फत धान्याचे वितरण केले जाते. शिधापत्रिकेतील प्रत्येक लाभार्थ्याचे आधारकार्ड आरसीएमएस प्रणालीशी संलग्न करण्यात आले आहे. धान्याचा लाभ केवळ पात्र व्यक्तींनाच मिळावा आणि वितरणातील गैरप्रकारांना आळा बसावा, यासाठी ई-केवायसी प्रक्रिया राबविण्यात येत आहे. लाभार्थ्यांनी जवळच्या रास्त भाव दुकानात जाऊन आधार प्रमाणीकरणाद्वारे ई-केवायसी करून घेणे आवश्यक आहे. शिधापत्रिकेतील प्रत्येक सदस्याची ई-केवायसी पूर्ण होणे अपेक्षित आहे. ३० सप्टेंबरनंतरही ज्या लाभार्थ्यांची ई-केवायसी झालेली नसेल, त्यांना धान्याची आवश्यकता नसल्याचे गृहित धरून त्यांच्या शिधापत्रिकेवरील धान्याचा लाभ बंद केला जाऊ शकतो.

जिल्ह्यातील सर्व संबंधित नागरिकांनी मुदतीपूर्वी ई-केवायसी करून घ्यावी. तसेच यासंदर्भातील कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पुरवठा विभागाने केले आहे.

error: Content is protected !!