Sunday, October 18, 2026
Homeकोकणलायन्स क्लब डिस्ट्रिक्ट ३२३१-ए४ च्या ऑक्टोबर सेवा सप्ताहाचा वाशीत समारोप

लायन्स क्लब डिस्ट्रिक्ट ३२३१-ए४ च्या ऑक्टोबर सेवा सप्ताहाचा वाशीत समारोप

वाशी, कोकणनामा वृत्त- वाशी, नवी मुंबई येथे आंतरराष्ट्रीय लायन्स क्लब डिस्ट्रिक्ट ३२३१-ए४ च्या ऑक्टोबर सेवा सप्ताह २०२६ चा भव्य समारोप उत्साहात पार पडला. ‘एकत्र येऊन सेवा करूया’ या संदेशासह १ ते ९ ऑक्टोबर दरम्यान राबवलेल्या उपक्रमांमधून जिल्ह्यात सेवाकार्याची मोठी चळवळ उभी राहिली. लेझीम आणि ताशाच्या गजरात मान्यवरांचे स्वागत करण्यात आल्यानंतर प्रथम जिल्हा ग्लोबल सर्विस टीमचे अध्यक्ष लायन अनिल म्हात्रे यांनी या सेवा सप्ताहाच्या यशाचा आढावा सादर केला.

या नऊ दिवसांत कर्करोग जनजागृती रॅली, रुग्णालयाला रेफ्रिजरेटर भेट, ई-कचरा संकलन, पूर्वलक्षित १,५०० झाडांचे संगोपन आणि नवीन १,५०० झाडांची लागवड यांसारखे पर्यावरणपूरक उपक्रम पार पडले. सोबतच आदिवासी भागासाठी सौरऊर्जा पॅनेल, विद्यार्थ्यांना सायकली व शैक्षणिक साहित्य वाटप, अन्नदान, नेत्रतपासणी व नेत्रदान जनजागृती, मधुमेह व मानसिक आरोग्य कार्यक्रम आणि रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा प्रांतपाल लायन प्रवीण सरनाईक, प्रमुख वक्ते माजी इंटरनॅशनल डायरेक्टर लायन विजय कुमार राजू, विशेष निमंत्रित लायन पंकज मेहता, लायन मनीष लाडगे, मल्टिपल कौन्सिल चेअरमन लायन फिरोज कात्रक, उप प्रांतपाल लायन विजय गणात्रा, लायन डॉ. नमिता मिश्रा आणि जिल्हा सेक्रेटरी नयन कवळे यांच्यासह इतर पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या समारोहाचे मुख्य आकर्षण ठरलेल्या पर्यावरणपूरक फोटो प्रदर्शन व स्पर्धेत ४० क्लबने भाग घेतला. लायन भरत दत्त आणि लायन होजेफा कुरेशी गढियाली यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. ३० पेक्षा कमी सदस्य गटात लायन्स क्लब ऑफ द्रोणागिरीने प्रथम, लायन्स क्लब ऑफ श्रीबाग सेंटेनियल व वाशी गोल्ड यांनी संयुक्त द्वितीय, तर नागोठणे व वाशी रुबी यांनी संयुक्त तृतीय क्रमांक पटकावला. ३० पेक्षा अधिक सदस्य गटात लायन्स क्लब ऑफ खोपोलीने प्रथम, न्यू बॉम्बे वाशी व अलिबाग यांनी संयुक्त द्वितीय आणि उलवे जेम्सने तृतीय क्रमांक मिळवला. लिओ क्लब गटात अलिबागने प्रथम, ऐरोलीने द्वितीय, तर ऑरेलियन व पनवेल यांनी संयुक्त तृतीय क्रमांक पटकावला. तसेच लायन लेडी ऑक्झिलरी गटात ट्रॉम्बे क्लबने पुरस्कार पटकावला. अध्यक्ष लायन अनिल म्हात्रे यांनी या यशाबद्दल सर्व पदाधिकारी, सदस्य व स्वयंसेवकांचे अभिनंदन केले.

संपादक उमाजी म. केळुसकर
संपादक उमाजी म. केळुसकरhttp://kokannama.in
सा. कोकणनामा या वृत्तपत्राचे संपादक, साहित्यिक उमाजी म. केळुसकर हे गेली ४० वर्षे पत्रकारितेत आहेत. कथा, कादंबरी, ललितलेख, गूढकथा, ऐतिहासिक कथा, बालकथा, कविता, नाटक आदी त्यांची २० पुस्तके प्रकाशित झाली आहेत. या पुस्तकांसह साहित्य आणि पत्रकारिता क्षेत्रातील निर्भीड आणि रचनात्मक कार्याबद्दल राज्यातील विविध संस्थांतर्फे त्यांना पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

error: Content is protected !!