Sunday, October 18, 2026
Homeकोकण८५ व्या वर्षात पदार्पण करतानाही शंकरराव म्हात्रे यांची जनसेवेची धग कायम :...

८५ व्या वर्षात पदार्पण करतानाही शंकरराव म्हात्रे यांची जनसेवेची धग कायम : शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांच्याकडून गौरव

धोकवडे, कोकणनामा वृत्त- शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते शंकरराव म्हात्रे यांचा वाढदिवस सोहळा शनिवारी (दि. १०) त्यांच्या धोकवडे येथील राहत्या घरी मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शंकरराव म्हात्रे यांच्या पत्नी शैलजा शंकरराव म्हात्रे आणि कुटुंबियांनी त्यांचे प्रथम औक्षण केले. वयाची ८४ वर्षे पूर्ण करुन ८५ व्या वर्षात पदार्पण करत असतानाही म्हात्रे यांच्यातील कार्यकर्त्याचा उत्साह आणि उमेद आजही कायम असल्याचे गौरवोद्गार शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी या प्रसंगी काढले.

जयंत पाटील यांनी शंकरराव म्हात्रे यांच्या राजकीय व सामाजिक योगदानाचा गौरव करताना सांगितले की, १९६७ पासून म्हात्रे यांनी शेतकरी कामगार पक्षासाठी निष्ठेने कार्य केले असून पक्षाच्या वाढीसाठी आणि परिसराच्या विकासासाठी मोठे योगदान दिले आहे. आणीबाणीनंतर जिल्हा व तालुक्यात पक्षाची पुनर्बांधणी करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे सांभाळली. रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष स्व. प्रभाकर पाटील आणि माजी विरोधी पक्षनेते ॲड. स्व. दत्ता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या चौदा गाव बचाव आंदोलनाचे नेतृत्व शंकरराव म्हात्रे यांनी केले. त्यांनी या आंदोलनाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करत त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली.

या सोहळ्यात जयंत पाटील यांच्या हस्ते शंकरराव म्हात्रे यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमाला शेकापचे ज्येष्ठ नेते द्वारकानाथ नाईक, शेकाप तालुका चिटणीस सुरेश घरत, अशोक नाईक, ॲड. विजय पेढवी, संदीप गायकवाड, रायगड बाजारचे उपाध्यक्ष प्रमोद घासे, पंचायत समितीच्या माजी सदस्य स्नेहा म्हात्रे, माजी सरपंच सचिन म्हात्रे, श्राव्या सचिन म्हात्रे, जगन्नाथ पाटील, मज्जीद कुर, किहीमचे उपसरपंच मिलिंद पडवळ, नवगावचे उपसरपंच निखिल कवळे, नैना शिलधनकर, नयन नाखवा, योगेश गावंड, किसन गायकवाड, सुरेंद्र कटोर, विशाल शेट्ये, अरुख मनीयार यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि म्हात्रे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादक उमाजी म. केळुसकर
संपादक उमाजी म. केळुसकरhttp://kokannama.in
सा. कोकणनामा या वृत्तपत्राचे संपादक, साहित्यिक उमाजी म. केळुसकर हे गेली ४० वर्षे पत्रकारितेत आहेत. कथा, कादंबरी, ललितलेख, गूढकथा, ऐतिहासिक कथा, बालकथा, कविता, नाटक आदी त्यांची २० पुस्तके प्रकाशित झाली आहेत. या पुस्तकांसह साहित्य आणि पत्रकारिता क्षेत्रातील निर्भीड आणि रचनात्मक कार्याबद्दल राज्यातील विविध संस्थांतर्फे त्यांना पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

error: Content is protected !!